![street-dogs-01](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/05/street-dogs-01-696x447.jpg)
मिरजेतील सांगली रस्त्यावर मोकाट कुत्रे आडवे आल्याने अपघातात पुणे येथे कार्यरत असणारे मिरजेतील सुभाषनगर येथील पोलीस हवालदार सम्राट काकासो कदम (वय 40) हे ठार झाले, तर दुचाकाचालक प्रकाश तातोबा संपकाळ हे जखमी झाले.
पुण्यातील बालाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सम्राट कदम हे त्यांचा मेव्हणा प्रकाश संकपाळ यांच्या दुचाकीवरून सोमवारी रात्री नऊ वाजता सांगलीकडे जात होते. यावेळी मिरजेतील सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर अचानक
मोकाट कुत्रे आडवे आल्याने दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून दोघेही रस्त्याच्या पलीकडे पडले. यावेळी समोरून वेगात आलेल्या मोटारीने हवालदार सम्राट कदम यांना धडक दिली.यामध्ये गंभीर जखमी झालेले कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीचालक प्रकाश संपकाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सांगलीत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
■ सांगली शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, मोकाट कुत्र्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. या अपघातात पोलीस हवालदार सम्राट कदम यांचा नाहक बळी गेला. सम्राट कदम यांनी वीस वर्षे पोलीस दलात सेवा केली होती. कदम यांच्यामागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. पोलिसांनी दुचाकीचालक प्रकाश संपकाळ (रा. कवठेपिरान, ता. मिरज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गांधी चौक पोलीस अधिक तपास करीत आहेत.