राहुरी, नेवासा, कोपरगावातील 12 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

कृषी निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये खतांची लिकिंग (संलग्न विक्री) जादा दराने खतेविक्री व विक्री व्यवहार नोंदीतील त्रुटी आदी गैरप्रकार निदर्शनास आल्याने राहुरीसह नेवासा व कोपरगाव तालुक्यांतील तब्बल 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.

खरीप हंगाम 2024-25 मध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दरात मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय गुणनियंत्रण निरीक्षक व भरारी पथकांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान विविध कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर नियमभंग केल्याचे प्रकार आढळल्यामुळे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी कठोर कारवाई कारवाई करण्याचे आदेश दिले होते. व्यवहार नोंदी, ज्यादा दराने खतेविक्री, खतांची लिंकिंग असे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कृषी निविष्ठा विक्री कायदे व नियमानुसार कारवाई करावी, अशा सूचना सालीमठ यांनी दिल्या आहेत.

तपासणीदरम्यान, राहुरी, नेवासा व कोपरगाव तालुक्यांतील 12 कृषी सेवा केंद्रांमध्ये खतांची लिंकिंग (संलग्न विक्री), जादा दराने खते विक्री- विक्री व्यवहार, नोंदीतील त्रुटी आदी गैरप्रकार निदर्शनास आले. दरम्यान, संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांना म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. संबंधित विक्रेत्यांची सुनावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यानंतर त्यांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील कारवाई प्रक्रियेनुसार केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी खते किंवा अन्य कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राहुरी तालुक्यातील 3, नेवासातील 6, तर कोपरगावमधील 3 अशा तब्बल 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यापैकी राहुरी व कोपरगाव तालुक्यांतील प्रत्येकी एक अशा 2 कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहेत. इतर 10 कृषी सेवा केंद्रांचे परवाने 3 महिने ते वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी