![Saurabh Bhardwaj](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Saurabh-Bhardwaj-1-696x447.jpg)
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झाला. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. यात माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांचाही समावेश आहे. ग्रेटर कैलाश मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या सौरभ भारद्वाज यांचा भाजपच्या शिखा रॉय यांनी 3,188 मतांनी पराभव केला. या पराभवानंतर सौरभ भारद्वाज यांनी एक युट्यूब चॅनेल काढले आहे. ‘बेरोजगार नेता’ असे नाव या युट्यूब चॅनेलला देण्यात आले असून याद्वारे ते रोज नवीन मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण दिल्ली बदलली आहे. आमच्यासारख्या नेत्यांचे आयुष्यही 180 डिग्रीत बदलले आहे. आज आम्ही बेरोजगार नेते झालो आहोत. अनेक लोक याबाबत व्हॉटसअप, ट्विटरवर प्रश्न विचारत आहेत. एक निवडणूक हरल्यानंतर नेत्याच्या आयुष्यात काय आणि कसे बदलते हे मी तुम्हाला सांगणार आहे. एवढेच नाही तर तुमच्या प्रश्नांची उत्तरेही देणार आहे, असा व्हिडीओ सौरभ भारद्वाज यांनी ‘बेरोजगार नेता’ या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.
आप नेते सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलाश मतदारसंघातून तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकले होते. मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर सौरभ भारद्वाज यांना मंत्रीपद मिळाले होते. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवास झाल्यानंतर सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्री अतिशी यांच्यासोबत मिळून सरकार चालवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
सौरभ भारद्वाज हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. राजकारणात येण्याआधी ते जॉन्सन कंट्रोल इंडियासोबत काम करत होते. मायक्रो चिप्स आणि कोडिंगमध्ये त्यांचा हातखंडा आहे. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी स्वत:चे युट्यूब चॅनेल काढले आहे.