प्रॉपर्टीचा वाद , वडिलांनी केला मुलावर चाकूहल्ला

विक्रीसाठी काढलेल्या प्रॉपर्टीत हिस्सा मागितल्याच्या रागातून वडिलांनीच मुलावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुलगा यश वाघचौरे याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर कुर्ला कॅम्प येथील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी माथेफिरू वडील अनिल वाघचौरे यांना अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अनिल वाघचौरे हे उल्हासनगर कुर्ला कॅम्प 4 येथील हनुमाननगर परिसरात राहतात. त्यांनी त्यांची प्रॉपर्टी विक्रीसाठी काढली होती. याचीच कुणकुण लागताच यश याने प्रॉपर्टीच्या विक्रीनंतर आलेल्या पैशातून हिस्सा मागण्यास सुरुवात केली. पैशांसाठी यश याने वडिलांकडे प्रॉपर्टी लवकरात लवकर विकण्यासाठी तगादा लावला. मंगळवारी याच गोष्टीवरून यशने वडिलांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दरम्यान भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावर संतापलेल्या अनिल यांनी मागचा पुढचा विचार न करता यशच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात यशला गंभीर दुखापत झाली.

वारंवार खटके उडायचे

वडील प्रॉपर्टीचा व्यवहार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर यशने त्यांच्यामागे पैशांच्या हिस्स्यासाठी तगादा लावला. या प्रॉपटीत हिस्सा मागत असल्याच्या वादातून त्या दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. अखेर संतापाचा भडका उडाल्यानंतर वडिलांनी पोटच्या मुलावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी आईने दिलेल्या तक्रारीवरून वडिलांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी सांगितली.