मोदींच्या नावाने ग्रंथसंग्रहालयाचा फार्स; ठाणे पालिकेकडे पैसेच नाहीत, अर्थसंकल्पातील एक कोटींची तरतूद गेली कुठे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूश करण्यासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. ठाणे महापालिकेनेदेखील त्यांच्या नावाने शहरात ग्रंथसंग्रहालय उभारण्याची घोषणा एक वर्षापूर्वी केली. त्यासाठी एक कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली गेली. पण प्रत्यक्षात ठाणे पालिकेकडे मोदींच्या नावाने ग्रंथालय उभारण्यासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतर योजनांप्रमाणे हादेखील फार्स ठरला असून एक कोटीची तरतूद गेली कुठे, असा सवाल विचारण्यात येत आहे.

शहराचा लौकिक वाढविणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आणि ग्रंथालये शहरात आहेत. या लौकिकाला साजेसे ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय पालिकेमार्फत सुरू करण्यात येणार होते. ठाणे शहराचा मानबिंदू ठरेल असे मध्यवर्ती ग्रंथालय उभे करून त्याला ‘नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय’ असे नाव ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी मोठा गाजावाजा करून अर्थसंकल्पात ग्रंथसंग्रहालयाची घोषणा करत मिंधे आणि भाजपला खूश केले. मात्र प्रत्यक्षात हे ग्रंथसंग्रहालय कागदावरच असून ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने अद्याप तरी ग्रंथालयाच्या उभारणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

टीडीआरमधून बांधली जाणार होती वास्तू

मोदींच्या नावाचे उभारण्यात येणारे ग्रंथसंग्रहालय विकासकामार्फत कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार होते. यासाठी साधारणपणे 33 हजार चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत ग्रंथालय उभारण्याचा मानस होता. मात्र प्रत्यक्षात ग्रंथसंग्रहालयाचे स्वप्न अपुरे राहिले असल्याची खंत ठाणेकरांना व्यक्त केली आहे.

■ आधुनिक तंत्रज्ञानाने उभारण्यात येणार ग्रंथसंग्रहालयात ई-बुक, ऑडिओ बुक, लेखक-वाचक संवाद, चर्चासत्रे, लिखाणासाठी पोषक वातावरण असे या ग्रंथालयाचे स्वरूप असल्याची घोषणा करण्यात आली होती, पण वर्ष उलटले तरी प्रत्यक्षात एक वीटही रचली गेली नाही.

■ मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय या लेखाशीर्षांतर्गत तब्बल एक कोटींची तरतूद तत्कालीन आयुक्तांनी केली. मात्र बदली झाल्यानंतर नवीन आलेल्या आयुक्तांनी याकडे विशेष लक्ष दिले नसल्याची बाब समोर आली आहे.