पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज दोन्ही देशांतील व्यापार आणि गुंतवणूक संबंध वाढवण्याबाबत चर्चा केली. विविध जागतिक उपक्रमांमध्ये संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी सहमती दर्शवली. मोदी आणि मॅक्रॉन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बाबींसह विविध जागतिक मुद्दय़ांवर जवळून समन्वय साधण्यास सहमती दर्शविली. दरम्यान, आज दोन्ही नेत्यांनी मार्सेली शहरात हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले.
मोदी यांनी मार्सेली येथील मजारग्यूज वॉर स्मशानभूमीला भेट देऊन पहिल्या महायुद्धात बलिदान देणाऱया हिंदुस्थानी सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. उत्पादन, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील प्रगती अधोरेखित करताना मोदींनी ‘विकसित भारत’च्या ध्येयाकडे देश वाटचाल करत असल्याचे सांगितले. तसेच व्यवसायांना हिंदुस्थानच्या बाजारपेठेत सामील होण्याचे आवाहन त्यांनी हिंदुस्थान-फ्रान्स सीईओएस पह्रममध्ये भाषण करताना केले.