![Corruption](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Corruption--696x447.jpg)
हिंदुस्थानात गेल्या दहा वर्षांत भ्रष्टाचार वाढला आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या 2024 च्या भ्रष्टाचार निर्देशांकानुसार हिंदुस्थानला 100 पैकी फक्त 38 गुण मिळाले असून, 96व्या स्थानावर घसरला आहे. आधी हिंदुस्थान 93व्या स्थानावर होता. जगातील सर्वांत कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांमध्ये डेन्मार्क पुन्हा अव्वल ठरला आहे. त्यानंतर फिनलँड, सिंगापूर, न्यूझीलंडचा क्रमांक आहे.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा निर्देशांक जगातील 180 देशांमध्ये अत्यंत भ्रष्ट ते भ्रष्टाचारमुक्त देश या प्रमाणात मोजते. 100 पैकी कमी गुण मिळविणारे देश हे सर्वाधिक भ्रष्ट मानले जातात. देशातील सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचाराचे प्रमाण किती यावर हे मूल्यांकन केले जाते आणि त्याआधारे गुण दिले जातात आणि स्थान ठरवले जाते. हिंदुस्थानच्या 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर देशात भ्रष्टाचार वाढल्याचे स्पष्ट होते.
चीनचे स्थान सुधारले
2014 मध्ये हिंदुस्थान 45व्या स्थानावर होता. 2024 मध्ये हिंदुस्थान 96व्या स्थानापर्यंत घसरला आहे. 100 पैकी अवघे 38 गुण मिळाले आहेत. 2023 मध्ये हिंदुस्थान 93व्या स्थानावर होता, याचाच अर्थ भ्रष्टाचार वाढत आहे.
शेजारील देश चीनची कामगिरी सुधारली आहे. चीनला 100 पैकी 43 गुण मिळाले. 76व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान 135, बांगलादेश 149, तर श्रीलंका 121व्या स्थानावर आहेत.
सर्वात भ्रष्ट देश
सुदान सर्वांत भ्रष्ट देश असून, 100 पैकी केवळ 8 गुण मिळाले. त्यानंतर सोमालिया (9 गुण), व्हेनेझुएला (10 गुण), सीरिया (12 गुण), लिबिया (13 गुण), इरिट्रिया (13 गुण), येमेन (13 गुण), इक्वेटोरियल गिनी (13 गुण)
कमी भ्रष्टाचार असलेले टॉप 10 देश
डेन्मार्क (90 गुण), फिनलँड (88), सिंगापूर (84), न्यूझीलंड (83), लक्झेंम्बर्ग (81), नॉर्वे (81), स्विर्झलँड (81), स्वीडन (80), नेदरलँड (78), ऑस्ट्रेलिया (77 गुण) या देशांत सर्वात कमी भ्रष्टाचार आहे.