![ganpati](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/ganpati-1-696x447.jpg)
पीओपीच्या गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यास न्यायालयाने मनाई केल्यानंतरही समुद्रातच बाप्पा जाणार, असा ठाम निर्धार गणेश मंडळांनी केला होता. मुंबई उपनगरातील अनेक गणेश मंडळांनी मंगळवारी वाजतगाजत, जल्लोषात विसर्जन मिरवणुका काढल्या, परंतु त्यांना पोलिसांनी समुद्रापर्यंत पोहोचू दिले नाही. तत्पूर्वी रस्त्यांवर सिमेंटच्या गोण्या रचून अडथळा निर्माण केला गेला. त्यामुळे संतप्त गणेशभक्तांनी बाप्पांचे विसर्जन न करता 12 तासांनंतर पहाटे मिरवणूक पुन्हा मागे वळवली. अनेक मंडळांनी गणेशमूर्ती मंडपात आणून झाकून ठेवल्या आहेत.
पश्चिम उपनगरात माघी गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. मंगळवारी उपनगरातील अनेक मंडळांनी वाजतगाजत विसर्जन मिरवणुका काढल्या. उंच गणेशमूर्ती असलेल्या कांदिवली, बोरिवलीतील मंडळांनी दरवर्षीप्रमाणे मार्वे समुद्रात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता.
बोरिवलीतील एका गणेश मंडळाची मिरवणूक पोलिसांनी मालवणी येथील अग्निशमन दलाजवळ रोखून धरली. त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात हमरातुमरीही झाल्याची माहिती आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मागून येणाऱया गणेश मंडळांपर्यंतही पोहोचले. कांदिवली श्री गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक पोलिसांनी हिंदुस्थान नाका येथे मोठय़ा प्रमाणात हिंदू कार्यकर्त्यांची गर्दी असल्याचे कारण सांगून मधेच अडवली आणि विसर्जन न करण्याची विनंती केली. अखेर कार्यकर्त्यांनी मूर्ती विसर्जनाशिवाय माघारी नेण्याचा निर्णय घेतला.
n काही कार्यकर्त्यांनी मार्वे येथे जाऊन समुद्राचे पाणी आणले. मूर्ती मंडपापर्यंत आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मूर्तीवर पाणी शिंपडून प्रतीकात्मक विसर्जन केले आणि मूर्ती पुन्हा झाकून ठेवली, अशी माहिती मंडळाचे खजिनदार सागर बामणोलीकर यांनी दिली. आता न्यायालयाकडून विसर्जनाला हिरवा कंदील मिळाल्यानंतरच पुन्हा वाजतगाजत मिरवणूक काढून मूर्तीचे समुद्रात विसर्जन करू असे त्यांनी सांगितले.