शुभमन गिलचे झंझावाती शतक आणि विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुलच्या आक्रमक खेळाच्या जोरावर 356 धावांचा डोंगर उभारणाऱया हिंदुस्थानने पाहुण्या इंग्लंडचा डाव अवघ्या 214 धावांत गुंडाळला आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजय हॅट्ट्रिक साजरी केली. याआधी पाच सामन्यांची मालिकाही हिंदुस्थानने 4-1 अशी जिंकली होती. मालिकेत 112, 60 आणि 87 धावांची खेळी करणारा शुभमन गिल सामनावीरसह मालिकावीरही ठरला.
आजचा अखरेचा सामनाही इंग्लंडला जिंकता आला नाही. गेल्या सामन्यात शतक ठोकणारा रोहित शर्मा अवघ्या एका धावेवरच बाद झाल, मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने 116 धावांची भागी रचली. कोहलीने 52 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्यानंतर गिलने श्रेयस अय्यरच्या साथीने 104 धावांची भर घालत तुफान फटकेबाजी केली. 40 षटकांत 275 धावा करणाऱया हिंदुस्थानचे तळाचे फलंदाज धडाधड बाद झाल्यामुळे शेवटच्या दहा षटकांत अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. तरीही हिंदुस्थानने 356 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर 357 धावांचे आव्हान पाहूनच मान टाकणाऱया इंग्लंडला फिल सॉल्ट (23) आणि बेन डकेटने (34) झंझावाती सलामी दिली, पण ही जोडी फुटल्यानंतर इंग्लंडसाठी कुणीही खंबीरपणे उभा राहिला नाही आणि त्यांचा हिंदुस्थानी गोलंदाजांनी 35 व्या षटकांतच संपुष्टात आणला.