![Janhvi & Rupali](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Janhvi-Rupali-696x447.jpg)
>> विठ्ठल देवकाते
जिम्नॉस्टिक्सपाठोपाठ मराठमोळ्या मल्लखांबतही महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व दाखवले आहे. दोरीचा मल्लखांब प्रकारात जान्हवी जाधवने सुवर्ण, तर रूपाली गंगावणेने रुपेरी यशाला गवसणी घातली. मुलींच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राने रौप्य पदकाची कमाई केली. आजचा दिवस खऱया अर्थाने गाजवला तो मुंबईच्या मल्लखांबपटूंनी.
वन चेतना स्टेडियममध्ये सुरू असलेल्या मल्लखांब स्पर्धेत पहिल्या दिवसापासूनच महाराष्ट्राचा बोलबाला राहिला. दोरीच्या मल्लखांब प्रकारात मुंबई उपनगरच्या जान्हवी जाधवने आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ करून सुवर्णयशाची भरारी घेतली. विश्व करंडक चॅम्पियन असणाऱया जान्हवीने कलात्मक प्रदर्शन करीत अवघड रचना सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. 8.65 गुणांची कमाई करीत सलग तिसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जान्हवीने आपल्या यशाचा झेंडा फडकविला. मुंबईतील विलेपार्ले श्री पार्लेश्वर व्यायामशाळेत सराव करणाऱया जान्हवीने अहमदाबाद स्पर्धेत 1 सुवर्ण 3 रौप्य तर गत गोवा स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 कांस्य पदकांची लयलूट केली होती. वयाच्या 11 व्या वर्षापासून ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारप्राप्त गणेश देवरुखकर यांचे मार्गदर्शन तिला लाभत आहे.
दोरीचा मल्लखांब प्रकारात मुंबईच्या खेळाडूंचा डंका वाजला. स्पर्धेत वयाने सर्वात मोठी असणारी 27 वर्षीय रूपाली गंगावणेने रूपेरी यश संपादले. चेंबूरमधील टमलिंग अॅकॅडमीत आठ तास सराव करणाऱया रूपालीने 8.45 गुणांची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पदकाची हॅटट्रिक केली. अहमदाबादमधील स्पर्धेत 3 सुवर्ण, 1 कांस्य, तर गत गोवा स्पर्धेत रूपालीने सुवर्ण चौकार झळकविला होता.
ज्युदोत पुण्याच्या आदित्य परबला कास्य
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा आदित्य परबने ज्युदो स्पर्धेतील 100 किलोवरील गटात कांस्य पदकाची कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले पहिलेवहिले पदक जिंकले. उत्पंठापूर्ण लढतीत हरयाणाच्या साहिल कुमार याला वाझाआरी या डावाचा उपयोग करीत पराभूत केले. याआधी महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडने सुवर्ण पदक जिंकले होते, तर आकांक्षा शिंदेला रौप्य पदक मिळाले होते.
महाराष्ट्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
38 वी राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रासाठी सर्वात यशस्वी ठरणार आहे. आधीच रौप्य आणि कांस्य पदकांची पन्नाशी गाठणाऱ्या महाराष्ट्राला सुवर्ण पदकांच्या यादीत पन्नाशी गाठायला केवळ तीन पदकांची गरज आहे. महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेच्या इतिहासात कधीही सुवर्ण, रौप्य आणि कांस्य या प्रत्येक पदकाचे अर्धशतक गाठता आले नव्हते. यंदा तो हा विक्रम करणारा पहिला संघ ठरणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्राने 47 सुवर्ण, 60 रौप्य आणि 62 कांस्य जिंकत 169 पदके जिंकली आहेत.
अडथळा शर्यतीत नेहाला कांस्य, तर रोहनला लॉटरी
महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या नेहा ढाबळेने 1 मिनिट 52 सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले. विथया रामराज व श्रीवर्थनी एस. के. या तामीळनाडूच्या धावपटूंनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाला गवसणी घातली, मात्र पुरुषांच्या याच शर्यतीत महाराष्ट्राच्या किरण मात्रेला कांस्य पदकाची लॉटरी लागली. कारण सेनादलाचा निखिल भारद्वाज याने तिसरा क्रमांक मिळविला होता.
किरण मात्रेकडून निराशा
पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या किरण मात्रेने निराशा केली. दोन फेऱ्यांपर्यंत आघाडीवर असलेला किरण नंतर प्रत्येक फेरीनंतर मागे पडत गेला. सहाव्या फेरीत सहाव्या स्थानापर्यंत घसरलेल्या किरणने पोटात दुखायला लागल्यामुळे अर्ध्यावरच शर्यत सोडल्याने महाराष्ट्राची पदकाची आशा संपुष्टात आली.
अॅथलेटिक्समध्ये संजीवनी जाधवला रौप्य
नाशिकच्या संजीवनी जाधवने महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत रौप्य, तर पूनम सोनूने कांस्य पदक जिंकून 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये आजचा दिवस गाजवला. याचबरोबर महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत नेहा ढाबरेने कांस्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत बिद्री (कोल्हापूर) येथील रोहन कांबळे यालाही कांस्य पदक मिळाले. संजीवनी जाधवकडून आज महाराष्ट्राला सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. यजमान उत्तराखंडची अंकिता आणि संजीवनी यांच्यात पहिल्या फेरीपासून पाठशिवणीचा खेळ रंगला होता.
संजीवनी सुवर्ण पदकाला गवसणी घालणार असे वाटत असताना अखेरच्या 300 मीटरमध्ये अंकिताने मुसंडी मारत संजीवनीला मागे टाकले. अखेरच्या टप्प्यासाठी राखून ठेवलेल्या दमचा वापर करीत अंकिताने 15 मिनिटे 56.03 सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या संजीवनीला 15 मिनिटे 59.13 सेकंद वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानाने लागले. महाराष्ट्राच्या पूनम सोनूने हिने 16 मिनिटे 53.52 सेपंद वेळ नोंदवित कांस्य पदक जिंकले. याचबरोबर महाराष्ट्राची रिंकू पवारही या लांब पल्ल्याच्या शर्यतीत चौथ्या स्थानी राहिली. संजीवनी जाधवने सुवर्ण पदकाला गवसणी घातली असती तर महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला असता.