![Ranji Trophy](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Ranji-Trophy-696x447.jpg)
पहिल्या डावात सलमान निझारने वैयक्तिक शतकासह बासिल थम्पीबरोबर दहाव्या विकेटसाठी केलेल्या 81 धावांच्या संघर्षपूर्ण भागीच्या जोरावर घेतलेल्या एका धावेच्या आघाडीने केरळला रणजी करंडकाच्या इतिहासात दुसऱयांदा उपांत्य फेरी गाठून दिली. हा सामना केरळच्या सलमान निझार आणि मोहम्मद अझरुद्दीनने झुंजार खेळ करत अनिर्णितावस्थेत सोडविण्याची किमया साधली. मात्र त्याचबरोबर यंदाच्या मोसमात धडाकेबाज कामगिरी करणाऱया जम्मू आणि कश्मीरचे उपांत्य फेरीत धडक मारण्याचे स्वप्न भंग झाले. त्यामुळे आता केरळ आणि गुजरात यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगेल तर मुंबई आणि विदर्भ हे नागपूरमध्ये भिडतील.
उपांत्यपूर्व फेरीचा आजचा सामना अत्यंत थरारकरीत्या संपला. जम्मू-कश्मीरने आपला डाव 399 धावांवर घोषित करून केरळसमोर 399 धावांचेच जबर आव्हान दिले होते. मंगळवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी केरळने 2 बाद 100 अशी मजल मारली होती आणि त्यांना अखेरच्या दिवशी 299 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. केरळसाठी हे आव्हान खडतर होतेच, पण दुसरीकडे जम्मू-कश्मीरने टप्प्याटप्प्याने आणखी चार विकेट घेत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले होते. चहापानाआधी केरळची 6 बाद 180 अशी अवस्था झाली होती, मात्र त्यानंतर निझार आणि अझरुद्दीनने तब्बल 43 षटके किल्ला लढवत जम्मू-कश्मीरला विजयापासून दूर ठेवले आणि संघाला उपांत्य फेरी गाठून दिली. निझारने 44 तर अझरुद्दीनने 67 धावांची खेळी करत 115 धावांची अभेद्य भागी रचली. याआधी केरळने 2019-20 मध्ये सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठली होती.
केरळच्या उपांत्य फेरी प्रवेशाचा चमत्कार निझारच्या 112 आणि 44 धावांच्या अभेद्य खेळींनी घडवून आणला. विशेष म्हणजे दोन्ही डावांत निझारने झुंजार भागीदाऱया करत जम्मू-कश्मीरची रणजी करंडकातील फाईल बंद केली.