मेटाचे इन्स्टाग्राम टीन अकाउंट फिचर येतेय; पालकांचा आता मुलाच्या खात्यावर वॉच असणार

हिंदुस्थानात आता इन्स्टाग्राम वापरणाऱ्या किशोरवयीन मुलांवर पालकांना लक्ष ठेवता येणार आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पॅरेट कंपनी मेटा लवकरच हिंदुस्थानात एक नवीन फिचर आणणार असून या फिचरचे नाव ‘इंस्टाग्राम टीन अकाउंट्स’ असे असणार आहे. हे फीचर किशोरवयीन मुलांसाठी डिझाईन करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह आणि अश्लिल कंटेट मुलांपर्यंत पोहोचू नये, यासाठी हे फिचर असणार आहे.

किशोरवयीन मुलांची खाती स्वयंचलितपणे उच्च सुरक्षा सेटिंग्जवर असतील. यामध्ये, गोपनीयता सेटिंग्ज वाढवून, पालकांकडून अधिक देखरेख सुनिश्चित केली जाऊ शकते. पालक त्यांच्या मुलांच्या खात्यांवर लक्ष ठेवू शकतील. या खात्यात अनेक सुरक्षा फिचर्स देण्यात येतील. यामुळे किशोरवयीन मुलांना सुरक्षित आणि योग्य कंटेट मिळण्यास मदत होईल. या नव्या फिचरमध्ये पालकांना त्यांच्या मुलांच्या या खात्यांवरील बदलांना मंजुरी देण्याची, संपर्कांची पाहणी करण्याची, स्क्रीन टाइम मर्यादा सेट करण्याची, आणि विशिष्ट वेळांमध्ये अॅपच्या वापरावर निर्बंध लावण्याची सुविधा मिळते. इंटरनेट मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणाऱ्या दुष्परिणाम यांबद्दलच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर मेटाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. या अॅपचा कोणी गैरवापर करू नये, यासाठी वय पडताळणी पद्धतीमध्ये मेटा सुधारणा करण्याच्या तयारीत आहे, असे मेटाकडून सांगण्यात आले आहे.

पालकांची चिंता मिटणार
इन्स्टाग्राम टीन अकाउंट पालकांच्या मुलांच्याबद्दल असलेल्या अनेक चिंता कमी करण्याचे काम करेल. या फिचरमुळे मुले ऑनलाईन कोणाशी संवाद साधतात, ते कोणत्या प्रकारचा कंटेट पाहतात. ते कसा वेळ घालवतात, या सर्व गोष्टी पालकांना समजू शकतील. दिवसात 60 मिनिटे अॅप वापरल्यानंतर मुलांना अॅपमधून बाहेर पडण्याचा अलर्ट मिळेल. तसेच स्लीप मोडमध्ये रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सक्रीय राहतील. त्यामुळे या वेळेत नोटिफिकेशन्स आपोआप म्यूट होतील.