![mirkarwada](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mirkarwada-696x447.jpg)
मिरकरवाडा बंदरातील बेकायदेशीर बांधकामे हटविण्यात आली आहेत. ही नाण्याची एक बाजू झाली असून नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या 25 वर्षात ही अनधिकृत बांधकामे ज्यांच्या आशिर्वादाने उभी राहिली आहेत, जे अधिकारी आणि राजकीय पुढारी गॉडफ़ादर होते त्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कॉंग्रेसच्या कोकण प्रांत विधी प्रमुख ॲड.अश्विनी आगाशे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही मागणी केली.
काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने मिरकरवाडा बंदरातील 319 अनधिकृत बांधकामे हटवली. त्या कारवाईनंतर ॲड. अश्विनी आगाशे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत महत्वाची मागणी केली आहे. ॲड. अश्विनी आगाशे म्हणाल्या की, अनधिकृत बांधकामावर कारवाई केली ते योग्य आहे.पण गेली 25 वर्षे ही अनधिकृत बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली. गेल्या 25 वर्षात या अनधिकृत बांधकामांवर कारवाई का झाली नाही. सरकारी जागेवर ही बांधकामे उभी रहात असताना अधिकारी झोपले होते का? असे सवालही त्यांनी केले. ही अनधिकृत बांधकामे उभी रहाताना काहींनी आर्थिक फायदाही घेतला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. ही अनधिकृत बांधकामे उभी रहायला जे अधिकारी जबाबदार आहेत किंवा या बांधकामांचे जे गॉडफ़ादर आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मतांसाठी पुढाऱ्यांनी वापर केला
गेल्या 25 वर्षात मिरकरवाडा बंदरात अनधिकृत बांधकामे उभी राहिली. कच्च्या बांधकामांची पक्की बांधकामे उभी रहातात. तरीही कुणाचं लक्ष जात नाही. ही जी झोपडपट्टी उभी राहिली त्यांचा राजकीय पुढाऱ्यांनी मतांसाठी उपयोग केला. अशा पुढाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी रूपाली सावंत,दीपक राऊत आणि काका तोडणकर उपस्थित होते.