
जिम्नॉस्टिक्समध्ये किमया कार्ले आणि परिणा मदनपोत्रा या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 16व्या दिवशी सकाळच्या सत्रात दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून धडाकेबाज सुरुवात केली.भागीरथी संकुलात सुरू असलेल्या रिदमिक्स स्पर्धेतील बॉल प्रकारात ठाण्याच्या किमया कार्ले हिने बाहुलीच्या कॅरेक्टरचे अफलातून सादरीकरण केले. जिवंत बाहुलीच्या रूपात बॉलवर वैविध्यपूर्ण प्रात्यक्षिके सादर करून पंचासह उपस्थित क्रीडाप्रेमींची वाहवाह मिळवीत किमयाने सर्वाधिक 25.95 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर मोहर उमटवली. मुस्काना राणा (25.75 गुण) व मान्या शर्मा (25.95 गुण) या जम्मू – काश्मीरच्या खेळाडूंनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.
रिदमिक्सच्या हुप प्रकारात ठाण्याच्या परिणा मदनपोत्रा हिने “तोबा तोबा..” आणि “लैला मैं लैला..” या बॉलिवूड गाण्यावर मंत्रमुग्ध करणाऱ्या अतिशय कलात्मक व अफलातून रचना सादर करून 24.45 गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकावर महाराष्ट्राचे नाव कोरले. याच प्रकारात महाराष्ट्राच्या किमयाने क्रुवेला या कॅरेक्टरवर एटीट्यूड आणि खुन्नस या थीमवर सुरेख रचना सादर करुन 24.15 गुणांसह रुपेरी यश मिळविले. हरियाणाची लाइफ अदलखा 24.05 गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली. किमया कार्ले ही मानसी गावंडे व पूजा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते, तर परिणा मदनपोत्रा हिला वर्षा उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले आहे.