1984 च्या शीख दंगली- दोन शीखांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार दोषी; शिक्षेबाबत 18 फेब्रुवारीला होणार युक्तीवाद

दिल्लीतील 1984 च्या शीख दंगलप्रकरणी दोन शीखांच्या हत्येशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांच्या शिक्षेबाबत 18 फेब्रुवारी रोजी युक्तीवाद करण्यात येणार आहे.

1 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील सरस्वती विहार येथे जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या हत्येशी संबंधित खटल्यात सज्जन कुमार आरोपी होते. या प्रकरणात न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. न्यायालयाने सज्जन कुमार यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार आरोप निश्चित केले होते. एसआयटीचा आरोप आहे की, सज्जन कुमार जमावाचे नेतृत्व करत होते आणि त्यांच्याच प्रेरणेने जमावाने दोघांना जिवंत जाळले. त्यांच्या घरातील वस्तू आणि इतर मालमत्तेचेही नुकसान केले. सामानाची नासधूस आणि लूट करण्यात आली, असाही त्यांच्यावर आरोप आहे.

जमावाने पीडितांचे घर जाळले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि त्यांच्या घरात राहणाऱ्या नातेवाईकांना गंभीर दुखापत केली. 1 नोव्हेंबर 2023 रोजी न्यायालयाने या प्रकरणात सज्जन कुमार यांचे जबाब नोंदवले होते. सज्जन कुमार यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. 31 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, सज्जन कुमार यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, त्यांचे नाव सुरुवातीपासूनच त्यात नव्हते. साक्षीदाराने 16 वर्षांनी सज्जन कुमार हे नाव घेतले. तर सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, पीडिता आरोपीला ओळखत नव्हती. जेव्हा त्याला सज्जन कुमार कोण आहे हे कळले तेव्हा त्याने त्याच्या जबाबात त्यांचे नाव घेतले. सज्जन कुमार सध्या दिल्ली कॅन्टमधील आणखी एका शीखविरोधी दंगली प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.