![_solapur news](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/solapur-news-696x447.jpg)
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसताना देखील वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी केलेला दृढनिश्चय कामी आला आणि कामगार वस्तीमधील आठ पत्र्याच्या घरातील गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला. संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी या दोन नावांची नावं आहेत.
ज्योतीराम भोजने हे गवळी वस्तीमधील कामगार वस्ती भागात राहतात. आर्थिक अडचणीमुळे पाचवीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. मात्र, मेकॅनिकल क्षेत्राची माहिती असल्यामुळे ते गॅरेज चालवतात. ज्योतीराम यांना संजीवनी आणि सरोजिनी या दोन मुली आणि श्रीनिवास हा एक मुलगा आहे. ज्योतीराम ज्या घरात राहतात ते घर आठ पत्र्याचे असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले आयुष्य काढले आहे. ज्योतीराम यांना आपल्या वडिलांच्या आजारपणातच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या खचून गेले होते. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा तर विचार न केलेलाच बरा असाच प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. परंतु दोन्ही मुलींनी बीकॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मोठी मुलगी संजीवनी आणि छोटी मुलगी सरोजिनी हिने बीकॉम नंतर 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) देण्याला सुरुवात केली. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे परीक्षाच होऊ न शकल्या नाही. यावेळी मात्र खचून न जाता दोघींचीही MPSC मध्ये यश मिळवायचेच हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीला सामोरे जात अखेर यशाचा झेंडा रोवलाच.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री साडेआठ वाजता जाहीर झाला. या परीक्षेत दोन्ही बहिणींनी उत्तम गुण मिळवून यशाची हॅट्ट्रिक मिळवली. त्यांच्या आई-वडिलांच्या मेहनतीला फळ मिळाले. त्यांच्या या यशाचे संपूर्ण सोलापूरात कौतुक होत आहे.
सामाजिक कार्यात रस….
आई-वडिलांचे प्रयत्न आणि सख्या भावाची जिद्द असल्यामुळेच आज आम्ही दोघींनी एमपीएससीमध्ये यशाचा झेंडा रोवला आहे. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा केवळ आणि केवळ सामाजिक कार्य करण्याच्या अनुषंगाने आणि आई वडील व भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून व अभ्यास करून परिस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे. याचा मनोमन आनंद वाटतो. तीन वेळा पीएसआयची परीक्षा दिली. एक वेळा सेल्स टॅक्स तर एकदा टॅक्स असिस्टंट पदासाठी परीक्षा दिली. मात्र, पॉईंट मध्येच मागे पडले. परंतु अपयश पदरी येऊन सुद्धा खचलो नाही. आणि अखेर मंगळवारी आनंदाचा दिवस उजाडला. एमपीएससी उत्तीर्ण झाले असून मंत्रालय महसूल विभागात क्लार्क म्हणून आपणास पोस्ट मिळणार आहे. मोठ्या पदापर्यंत पोहोचलो तरी गरिबी विसरणार नसल्याचे संजीवनी ज्योतीराम भोजने हिने सांगितले.
डोक्यात फक्त आणि फक्त यशच …..
सख्ख्या बहिणी असलो तरी आम्ही पक्क्या मैत्रिणी होतो. घरची परिस्थिती जाणून होतो. दररोजच घरचे अठरा विश्वदारिद्र्य डोळ्यासमोर दिसत होते. आठ पत्रे असलेल्या घरात आई, वडील, तीन भावंडं आणि आजी असे एकूण सहा जण कसेबसे दिवस काढायचो. यातून अभ्यासाला बसताना पाय सुद्धा पसरता येत नव्हते, अशी परिस्थिती होती. परंतु आई-वडील आणि भावाची आम्हा दोघींना शिकवण्याची जिद्द होती. त्याच जिद्दीला आम्ही सुद्धा साथ दिली आणि कोणत्याही परिस्थितीत एमपीएससी मध्ये यश मिळवायचंच अशी मनाची खूनगाठ बांधली. आणि यशाला गवसनी घातली. आपण महसूल सहाय्यक आणि कर सहाय्यक अशा दोन्ही पदासाठी पात्र असलो तरी कर सहाय्यक म्हणून काम करण्याची आपली इच्छा आहे. त्यामध्येच आपण आपले करिअर घडवत सामाजिक कार्यात वाहून घेणार असल्याचे सरोजिनी ज्योतिराम भोजने हिने सांगितले.
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत होती. गॅरेजमधून आलेल्या थोड्या पैशामधूनच घर चालवायचं आणि त्यातूनच शिक्षणासाठी लागणारी पुस्तक खरेदी करून द्यायची. कोरोना काळात पूर्ण खचून गेलो होतो आणि आता मुलींचे शिक्षण थांबवावे असा निर्णय मनोमन घेतला होता. परंतु मुलींच्या जिद्दीपुढे मला सुद्धा काही करता आले नाही. आणि अनेकांनी मदतीचा हात दिला. आणि आज सोनेरी दिवस उजाडला, अशी प्रतिक्रिया संजीवनी आणि सरोजिनी यांचे वडील ज्योतीराम भोजने यांनी दिली.
यांची झाली मदत …
एमपीएससीचा अभ्यास करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे सरोजिनी आणि संजीवनी सांगतात. ज्या – ज्या वेळी पुण्याला परीक्षेला जावे लागत होते, त्यावेळी आवसे वस्ती आमराई परिसरात असलेले आणि शेती करत असलेले मावस भाऊ प्रशांत शिवाजी बचुटे यांनी आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधारसुद्धा दिला. त्यामुळेच परीक्षा भयमुक्त वातावरणात देता आली. तर कोरोना काळात घरात जागा कमी पडू लागल्यामुळे वडिलांचे मित्र ब्रह्मदेव खटके यांनी गडदर्शन सोसायटीमधील त्यांच्या घराच्या खोल्या वर्षभरासाठी एकही रुपयाचे भाडे न घेता अभ्यासासाठी मोफत दिल्या. आई रेश्मा आणि आजी तारामती यांनी या कालावधीत सकाळ आणि सायंकाळ आशा दोन सत्रात चहा, नाष्टा आणि जेवण खोलीपर्यंत आणून दिले. त्यांचे उपकार आपण कधीच विसरणार नसल्याचे संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितले.