![_Mamata Banerjee](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/04/Mamata-Banerjee-4-696x447.jpg)
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि राज्यपाल यांच्यात वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल सीवी आंनद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष आणि तृणमूल काँग्रेसच्या 2 आमदारांना मानहाणीचा दावा करत नोटीस बजावली आहे. याप्रकरणी लवकरात लवकर माफी मागावी नाही तर 11 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार सायंतिका बॅनर्जी आणि रेयात हुसैन सरकार यांच्याकडे नोटीस पाठवण्यात आली आहे.
मे 2024 मध्ये बंगालच्या विधानसभेच्या 2 जागांवर पोटनिवडणुका झाल्या. ज्यामध्ये बारानगरमध्ये सायंतिका बॅनर्जी आणि भगवान गोला जागेवरून रेयात हुसैन सरकार हे विजयी झाले. मात्र यावेळी दोन्ही आमदारांच्या शपथविधीबाबत अडचण निर्माण झाली होती. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना या आमदरांची शपथ घेण्याचा अधिकार दिला नाही. या दोघांना उपसभापतींनी शपथ द्यावी, असे राज्यपालांनी सांगितले.
दरम्यान, दोन्ही आमदारांनी राजभवनावर जाऊन शपथ घेण्यास नकार दिला होता. राजभवन सुरक्षित नाही, असे त्यांचे म्हणणे होते. हे प्रकरण सुरू असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील राजभवनावर गंभीर वक्तव्य केले होते. राजभवनात महिला असुरक्षित असल्याचे गंभीर विधान ममता बॅनर्जी यांनी केले होते. मात्र, या विधानावर कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना असे विधान न करण्याचा सल्ला दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सुरू असतानाच तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांनी राज्यपालांवर गंभीर आरोप केले होते. याच प्रकरणी आता कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.