… तर आडवाणी यांच्या लढ्याला आज भाजपच्या लेखी शून्य महत्व राहिलेय, अंबादास दानवे यांचा टोला

जगभरात लॉर्ड ऑफ वॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वादग्रस्त आर्म डीलर अभिषेक वर्मा याने मिंधे गटात प्रवेश केला आहे. या अभिषेक वर्मावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि भाजपने गंभीर आरोप केले होते. त्यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप व मिंधे गटाला फटकारले आहे.

” शस्त्र व्यापार विश्वात ज्यावर मोठे आरोप झाले असा अभिषेक वर्मा हा शिंदे गटात गेला आणि तो राष्ट्रीय समन्वयकही झाला. आज शिंदेंचे छत्र असलेल्या भारतीय जनता पक्षाने वर्मावर 2006 साली मोठे आरोप केले होते. या आरोपानंतर वर्माने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यावर खटलादेखील भरला होता. मग आज अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे आडवणींवर भरलेला हा खटला विसरले आहेत की अभिषेक वर्मा हा माणूस त्यांच्या स्मरणातून गेला. म्हणून की काय भाजपची उपशाखा असलेल्या शिंदे गटात वर्मा सारखे लोक प्रवेश करतात आणि पदही मिळवत आहेत. असे असेल तर लालकृष्ण आडवाणी यांच्या लढ्याला आज भाजपच्या लेखी शून्य महत्व राहिले आहे, असे दानवे यांनी ट्विट केले आहे.

कोण आहे अभिषेक वर्मा ?

अभिषेक वर्माच्या कुटुंबाला काँग्रेसची पार्श्वभूमी असून स्कॉर्पियान पाणबुडी खरेदी प्रकरणातील संशयित आहे. 2006 साली भाजपने आरोप केले होते. जगभरात लॉर्ड ऑफ वॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विवादास्पद आर्म्स डीलरवर 2012 साली सीबीआयने धाडी टाकल्या होत्या.