![santosh deshmukh and krushna andhale](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/santosh-deshmukh-and-krushna-andhale--696x447.jpg)
संतोष हत्या प्रकरणातील धाराशिव कनेक्शन आता समोर आले असून, वाशी शहरातील मारेकऱ्यांच्या नवीन व्हिडिओत संतोष देशमुख यांचे मारेकरी सीसीटीव्हीत कैद झाले. या व्हिडिओत कृष्णा आंधळे हा ‘वॉन्टेड’ आरोपीही दिसल्याने मोठी खळबळ माजली आहे. देशमुखांचा खून करून ते वाशीमध्ये आश्रयाला आले होते. या मारेकऱ्यांचा वाशीतील आश्रयदाता कोण, याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील फकराबादचे सरपंच नितीन बिक्कड यांचे कराड गँगशी लागेबांधे असल्याचे आरोप झाले होते. पवनचक्की कंपन्यांना खंडणी मागणाऱ्या टोळीबरोबरही बिक्कड यांचे संबंध असल्याची सर्वत्र चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी बिक्कड यांनी पवनचक्की प्रकरणात गोळीबार झाल्याची तक्रारही वाशी पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीचे पुढे काय झाले हे कुणालाच कळले नाही, पण बिक्कड यांना पवनचक्की कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्ट मात्र मिळाले. मंत्री धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर खंडणीसाठी झालेल्या बैठकीला वाल्मीक कराड आणि नितीन बिक्कड हे दोघेही हजर होते, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता.
या पाश्र्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे वाशी शहरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाशी शहरातील हे सीसीटीव्ही फुटेज 9 डिसेंबरचे असून याच दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली. संतोष देशमुख यांची हत्या करून हे टोळके वाशीत आश्रयाला आले. पारा चौकातून पुढे पळतानाच्या या फुटेजने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.