![rajan vichare](https://www.saamana.com/wp-content/uploads/2022/11/rajan-vichare--696x447.jpg)
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा खेळ खेळलात म्हणून तुम्ही तरलात. हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर या.. जनताच तुमचा खेळ करेल, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी आज मिंधे-भाजपला सुनावले. हा फक्त तुमच्या सत्तेचा माज आहे. तो एक ना एक दिवस उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही विचारे यांनी ठणकावून सांगितले.
जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 30 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सव होणार आहे. त्याची तयारी आजपासून सुरू झाली असून कळवा येथे देवीची पाटपूजा करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजन विचारे यांनी मिंधे व भाजपवर सडकून टिकास्त्र सोडले. मला हलक्यात घेऊ नका, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावर भाष्य करताना विचारे म्हणाले की, कोणी कुणाला हलक्यात घेत नाही. पण हा फक्त तुमच्या सत्तेचा माज आहे. या सत्तेचा उपयोग जनतेच्या सुविधांसाठी करण्याची गरज आहे.
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. या तयारीचा शुभारंभ मंगळवारी देवीच्या पाट पूजेने करण्यात आला. देवीच्या पाट पूजा कार्यक्रमास माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, संजय दळवी, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, भारतीय कामगार सेना सचिव सुरेश मोहिते, ठाणे लोकसभा सचिव विश्वास निकम, विभाग समन्वयक बिपीन गेहलोत, उपशहरप्रमुख कळवा – मुंब्रा मुकुंद ठाकूर, विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर, राजू मोरे, दत्ता पागावले, विजय हंडोरे, प्रकाश पायरे, उपविभागप्रमुख दशरथ गुप्ता, शाखाप्रमुख अमोल हिंगे, सुधीर पाटील, संजय जाधव, राजकिरण तळेकर, सचिन पागावले, उपशाखाप्रमुख सूरज सोनकर, उपविभाग अधिकारी वरुण मानकामे, रवींद्र लोंढे, बाबू शेलार, शिवसैनिक संतोष पाटील, महिला शाखा संघटक अपर्णा भोईर, कल्पिता पाटील तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर शिवसैनिक चोप देतील
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विधान केले आहे. त्यावर बोलताना राजन विचारे म्हणाले, ठाण्यात सोलापूरकर कुठे दिसले तर त्यांना चोपू, असा इशारा त्यांनी दिला.
आधी एसटीचा दर्जा सुधारा
एसटीच्या कारभाराबाबत बोलताना माजी खासदार राजन विचारे यांनी सरकारची सालटीच काढली. ते म्हणाले की, परिवहन मंत्र्यांनी काही घोषणा केल्या आहेत. पण सर्वसामान्य प्रवासी ज्या एसटीमध्ये बसतात त्याचा दर्जा आधी सुधारा.