![mahavitaran-1](https://www.saamana.com/wp-content/uploads/2021/08/mahavitaran-1-1-696x447.jpg)
तालुक्यात कातकरी वाड्या आणि आदिवासी पाड्यांचे प्रमाण मोठे आहे. विकासापासून वंचित असलेल्या या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या खांद्यावर महावितरणकडून अदानी स्मार्ट प्रीपेड मीटरचे ओझे लादले जात आहे. महावितरणकडून छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या कामगिरीमुळे नागरिक धास्तावले आहेत. मात्र महावितरणच्या या जुलूमशाहीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवडणुकीच्या काळात मिंधेंनी जुमलेबाजी करत प्रीपेड मीटर लावले जाणार नाही असे आश्वासन दिले होते. मात्र खोट्या आश्वासनांच्या मदतीने निवडून आल्यानंतर या सरकारने त्यांच्याकडे पाठ फिरवली. मात्र एकवेळच्या जेवणाची भ्रांत असलेला आदिवासी, कातकरी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांनी पुढाकार घेतला आहे. महावितरणच्या या कारभाराविरोधात जिल्हापातळीवर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी तारे यांनी दिला आहे. वेठबिगार म्हणून काम करणारा समाज या स्मार्ट प्रीपेड मीटरचे बिल कसे भरू शकेल असा सवाल उपस्थित करत जुनेच मीटर कायम ठेवण्याची मागणी तालुकाप्रमुख संजय जाधव यांनी केली आहे.
20 झोपड्या अंधारात
जुने, नादुरुस्त मीटर बदलण्याचा घाट घालून महावितरण बळजबरीने गोरगरीब गरजूंवर स्मार्ट मीटर योजना लादत आहे. बंगालपाडा लगतच्या आदिवासी वाडीतील महावितरणकडून 20 झोपड्यांना गुपचूप अदानी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात आले. मात्र या मीटरला लाईट जोडणी न केल्याने आठ दिवसांपासून ही वाडी अंधारात होती.