जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राची पदकांची लयलूट, ऍक्रोबॅटिकमध्ये सुवर्ण चौकारासह एक रौप्य

>> विठ्ठल देवकाते 

गतवर्षीच्या विजेत्या महाराष्ट्राने जिमनॅस्टिकमध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 15व्या दिवशी पदकांची लयलूट केली. जिमनॅस्टिकच्या अक्रोबॅटिक प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तालबद्ध, सुरबद्ध आणि जबरदस्त बॅलन्स राखत अचंबित करणाऱया रचना सादर करून चार सुवर्ण पदकांसह एक रौप्य अशी पाच पदकांची लयलूट केली. रिदमिक्सच्या सांघिक गटातही महाराष्ट्राने सुवर्ण पदक जिंकले. याचबरोबर ट्रम्पोलिनमध्ये एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकांची कमाई करीत पदकतक्त्यातील आपले दुसरे स्थान आणखी बळकट केले.

भागीरथी क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. अक्रोबॅटिकमध्ये महाराष्ट्राने महिला दुहेरी, मिश्र दुहेरी, पुरुष सांघिक गट व महिला तिहेरी या चार गटांत सुवर्ण पदके जिंकली, मात्र या प्रकाराच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महिला दुहेरीत ऋतुजा जगदाळे व निक्षिता खिल्लारे या महाराष्ट्राच्या जोडीने जबरदस्त बॅलन्स आणि अचंबित करणाऱया रचना सादर करून 51.250 गुणांची कमाई करीत सुवर्ण पदक खेचून आणले. पश्चिम बंगालला 44.700 गुणांसह रौप्य व केरळने 43.500 गुणांसह कांस्य पदक जिंकले. ऋतुजा आणि निक्षिता दोघीही मुंबईच्या असून राहुल ससाणे व प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील श्री नारायणराव आचार्य विद्या निकेतन शाळा, चेंबूर येथे सराव करतात. ऋतुजाचे राष्ट्रीय स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक असून, निक्षिताचे हे पहिलेच पदक होय. मिश्र दुहेरीत शुभम सरकटे व रिद्धी जैस्वाल या छत्रपती संभाजीनगरच्या जोडीने सर्वाधिक 52.250 गुणांची कमाई करीत सुवर्ण पदक जिंकले. केरळने 47.720 गुणांसह रौप्य, तर कर्नाटकने 46.839 गुणांसह कांस्य पदक जिंकले. शुभम व रिद्धी या महाराष्ट्राच्या जोडीचे राष्ट्रीय स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्ण पदक होय. दोघेही प्रशिक्षक प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर येथील केआरएस स्पोर्ट्स ऍकॅडमीमध्ये सराव करतात.

पुरुष सांघिक गटात प्रशांत गोरे, नमन महावर, रितेश बोराडे, यज्ञेश भोस्तेकर या मुंबईच्या चौकडीने 64.650 गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला तिसरे सुवर्ण पदक जिंकून दिले. केरळने 61.210 गुणांसह रौप्य, तर कर्नाटकने 53.740 गुणांसह कांस्य पदक जिंकले. प्रशिक्षक राहुल ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या पुरुष संघाने हे सोनेरी यश संपादन केले. त्यानंतर महिला सांघिकमध्येही अक्षता ढोकळे, अर्णा पाटील व सोनाली बोराटे या त्रिमूर्तीनी 61.730 गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला अक्रोबॅटिकमधील चौथे सुवर्ण पदक जिंकून दिले. पश्चिम बंगालने 51.540 गुणांसह रौप्य, तर कर्नाटकला 42.750 गुणांसह कांस्य पदक जिंकले. राहुल ससाणे यांच्याच मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या महिला संघाने सोनेरी यश मिळाले, हे विशेष. या प्रकारात फक्त महाराष्ट्राला पुरुष दुहेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गणेश पवार व आदित्य काळकुंद्रे या मुंबईच्या जोडीने 61.020 गुणांसह हे रुपेरी यश मिळविले. या प्रकारात कर्नाटकने 62.050 गुणांसह सुवर्ण, तर हरयाणाने 59.840 गुणांसह कांस्य पदक जिंकले.

जिमनॅस्टिकच्या ट्रम्पोलिन प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वैयक्तिक प्रकारात एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या वैयक्तिक गटात छत्रपती संभाजीनगरच्या आयुष मुळे याने सर्वाधिक 48.74 गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला सुवर्ण पदक जिंकून दिले. गतवर्षी या स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागलेल्या आयुषने या वेळी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. प्रशिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे यश मिळविले. ‘ही तर फक्त माझी सुरुवात आहे. या स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणे हेच माझे मुख्य लक्ष होय, असे आयुषने सांगितले. महिलांच्या वैयक्तिक गटात डोंबिवलीच्या चैत्राली सोनवणे हिने 39.28 गुणांसह रौप्य पदक जिंकले. दहावीत शिकणारी चैत्रालीदेखील संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या प्रकारात सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार असलेली रिया पाखरे आपली कला सादर करताना खाली पडली अन् तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न एका क्षणात भंगले. हातचे पदक गेल्याने तिला मैदानावरच अश्रू अन् हुंदके अनावर झाले.

रिदमिक्समध्ये सांघिक सुवर्ण भरारी

रिदमिक्स प्रकारात महाराष्ट्राने सांघिक गटात नेत्रदीपक आणि अचंबित करणाऱया रचना सादर करून सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. संयुक्ता काळे, किमया कार्ले, परिणा मदनपोत्रा व शुभश्री मोरे या महिला चौकडीने एकूण 239.05 गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला हे सोनेरी यश मिळवून दिले. जम्मू-कश्मीर संघाला 231.65 गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर 192.60 गुणांसह हरयाणाने कांस्य पदक जिंकले. प्रशिक्षक मानसी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने हे अव्वल यश संपादन केले. या चारही मुली ठाण्याच्या असून त्या ठाण्यातच द फिनिक्स जिमनॅस्टिक्स अकादमी येथे सराव करतात.