माऊंटन बायकिंगमध्ये प्रणिताला सुवर्ण,ऋतिकाला रौप्य

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात  महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात ऋतिका गायकवाडने रुपेरी यश संपादन केले.

निसर्गरम्य उत्तराखंडच्या सातताल डोंगरदऱयातील खडकाळ मार्गावरील सात फेऱयांची शर्यत प्रणिता सोमणने एक तास 22 मिनिटे 10.818 सेकंदांत पूर्ण केली. तिची सहकारी व नाशिकची खेळाडू ऋतिका गायकवाड हिने कांस्य पदक जिंकताना हेच अंतर एक तास 27 मिनिटे 5.623 सेकंदांत पार केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच माऊंटन बाईकिंग या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. प्रणिता हिने क्रॉस कंट्री टाईम ट्रायल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते. टाईम ट्रायलमधील अव्वल यशामुळे आज तिने अतिशय आत्मविश्वासाने ही शर्यत जिंकली. टाईम ट्रायल शर्यतीप्रमाणे आजही तिला कर्नाटकची आंतरराष्ट्रीय सायकलपटू स्टार नरझरी हिचे आव्हान होते, मात्र प्रणिताने तिला कसे मागे ठेवायचे याचे योग्य नियोजन करून सलग दुसऱया सुवर्णयशाला गवसणी घातली.