मुंबईतील खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून दक्षिण -मध्य मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या खेळ महोत्सवाच्या महिला क्रिकेटमध्ये इन्फिनिटी क्वीन्स संघाने पारसिक चॅम्पियन्सचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. तसेच बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धांनाही स्पर्धकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
‘खेळ महोत्सव’च्या माध्यमातून गेले महिनाभर सुरू असलेल्या स्पर्धांना लाभलेल्या खेळाडूंचा सहभाग पाहाता लवकरच खासदार देसाई यांनी आपल्या विभागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धाचेही आयोजन करावे अशी मागणी केली जात आहे. विभागातील महिलांसाठी धारावीतील मनोहर जोशी विद्यालयात आयोजित क्रिकेट स्पर्धेला लाभलेला प्रतिसादही अभूतपूर्व होता. या स्पर्धेत निधी घरतने सर्वोत्कृष्ट फलंदाज, आकांक्षा दुबेने सर्वोत्कृष्ट गोलंदाज, रीना शाहने सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि आकांक्षा दुबेने सामन्याची सर्वोत्तम खेळाडू म्हणून आपली चमक दाखवली. धारावी विधानसभा क्षेत्रात आयोजित महिला क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला विठ्ठल पवार, प्रकाश आचरेकर, सुरेश सावंत, सतिश कटके, आनंद भोसले, किरण काळे, बाबा सोनावणे , संतोष पोटे, बाळा घाडीगावकर, गणेश चोगले आणि महादेव नारायणे यांची उपस्थिती लावली.
तसेच दादर पूर्वेला शारदा मंगल कार्यालयात कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. सहा वर्षांखालील मुलींच्या गटात ईशा मंगलपल्लीने प्रथम, अनाहिता महाजनने द्वितीय आणि समर्थ बिहानीने तृतीय स्थान मिळवले. या विजेत्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवले आणि त्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
बुद्धिबळ स्पर्धेत सुमारे 350 खेळाडूंनी उत्साहाने भाग घेतला. या स्पर्धेला विधानसभा संघटक राकेश देशमुख, नितीन पेडणेकर, अभिषेक सावंत, रवी गुप्ता, सुरेश काळे, दीपक पाटील, रवी घोले, अभिषेक बासुतकर तसेच सुनीता आयरे, उर्मिला पांचाळ, विशाखा जाधव, नीलेश बडदे आणि अक्षय मोरे आदी पदाधिकाऱयांची उपस्थिती होती.