![fire-brigade-bike](https://www.saamana.com/wp-content/uploads/2020/12/fire-brigade-bike-696x447.jpg)
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात सहा महिन्यांपूर्वी नियुक्ती झालेल्या 235 जवानांना वेतन आणि प्रशिक्षण भत्ता मिळाला नसल्यामुळे हे जवान आर्थिक संकटात सापडले आहेत. या जवानांनी बँक खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे दिली नसल्याने त्यांचे वेतन थकल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र पालिकेने स्वतः पुढाकार घेऊन आवश्यक कार्यवाही केली नसल्याने जवानांचे वेतन रखडल्याचा आरोप मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने केला आहे.
मुंबई अग्निशमन दलामध्ये मनुष्यबळ कमी असल्यामुळे आग आणि इतर मोठय़ा दुर्घटनेत मुंबईतील जनतेच्या जीविताचे तसेच मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी 910 पैकी 785 अग्निशामकांची पदे सहा महिन्यांपूर्वी भरली गेली. यामध्ये उर्वरित 235 अग्निशामक यांची 16 ऑगस्ट 2024 रोजी दलात नियुक्ती करण्यात आली. सदर अग्निशामक यांची मुंबई अग्निशमन दलात नियुक्ती होऊन सहा महिने होत आहेत तरी काही जणांचा प्रशिक्षण भत्ता व सर्व अग्निशामक यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे रखडलेले वेतन तातडीने द्यावे, अशी मागणी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेकडून बाबा कदम यांनी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि उपायुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे केली आहे.
असा बसला फटका
n सर्व भरती झालेले अग्निशामक हे महाराष्ट्राच्या अनेक जिह्यांतून तसेच खेडय़ापाडय़ातून आलेले आहेत. या महत्त्वपूर्ण व जोखमीच्या खात्यामध्ये नोकरी करत असताना त्यांना एकवेळचे जेवणसुद्धा पैसे नसल्यामुळे मिळत नाही अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. n यासंदर्भात मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी लेखी पत्रव्यवहार व 17 डिसेंबर रोजी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्या दालनात झालेल्या सभेत सदर विषय त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.