माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाच्या धक्क्यातून साहित्यक्षेत्र अद्याप सावरले नसतानाच ग्रामीण साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे प्राचार्य रा.रं. बोराडे यांच्या निधनाचे वृत्त आले. बोराडे सरांचे मंगळवारी सकाळी 8.30 वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. सायंकाळी सिडको स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ग्रामीण साहित्यविश्वाचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे प्राचार्य रा. रं. बोराडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी 8.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा, मुली प्रेरणा, तृप्ती, मंजुश्री, अरुणा या चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सिडको स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुतण्या संजीव बोराडे याने पार्थिवास मुखाग्नी दिला.
अंत्यसंस्काराला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महात्मा गांधी मिशनचे सचिक अंकुशराव कदम, मसापचे प्रा. कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, कुंडलिक अतकरे, डॉ. वासुदेव मुलाटे, प्रा. डॉ. दासू कैद्य, प्रा. डॉ. फ. मुं. शिंदे, बाबा भांड, के. ई. हरिदास, डॉ. ऋषिकेश कांबळे, अरविंद जगताप, द्वारकादास पाथ्रीकर, नीलेश राऊत, सुशीला मोराळे, डॉ. पी.एम. जाधव, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, प्रा. राजेश करपे, प्रा. डॉ. राम चक्हाण, प्राचार्य अशोक तेजनकर, प्रा. चंद्रकांत भराट, यज्ञवीर कवडे आदींची उपस्थिती होती.
अल्पपरिचय
रा. रं. बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर 1940 रोजी लातूर जिल्ह्यातील काटगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव येथेच प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडले. माढा, बार्शी, सोलापूर आणि नंतर छत्रपती संभाजीनगरात त्यांनी शिक्षण घेतले. दहावीमध्ये असताना त्यांनी लेखनाला सुरुवात केली. साधीसोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी मराठवाडी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. 1957 मध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. तेव्हापासून त्यांचा सृजनात्मक लेखनप्रवास अविरत चालू होता. जून 1989 मध्ये हिंगोली येथे भरलेल्या 17 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासह विविध ग्रामीण तसेच इतर अनेकविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली आहेत.
रा.रं. बोराडे यांची कथाकार म्हणून ख्याती झाली, पण ते एकाच साहित्य प्रकारात रमले नाहीत. कादंबरी, नाट्य़, विनोद, समीक्षा, बालसाहित्य अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी स्वैर संचार केला. पण ग्राम्य संस्कृतीशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही.
विविध पुरस्कारांनी सन्मानित
प्राचार्य रा.रं.बोराडे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरक पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार (एकूण 5 पुरस्कार), फाय फाऊंडेशन पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची सन्मानवृत्ती, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, अंबाजोगाई, आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार, मराठवाडा सेवा गौरव पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, जयवंत दळवी पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
साहित्यकृती
पाचोळा, आमदार सौभाग्यवती, नातीगोती, बुरूज, पेरणी ते ताळमेळ, मळणी, काळवण, राखण, गोंधळ, माळरान, बोळकण, करात, फजितवाडा, खोळंबा, बुरुज, हेलकाके, कणसं आणि कडबा, वसुली.