![mangrove](https://www.saamana.com/wp-content/uploads/2017/02/Mangrove-696x447.jpg)
मुंबई आणि आसपासच्या प्रदेशातील वृक्षसंपदा संपुष्टात येत असतानाच अदानीकडून विकासाच्या नावाखाली कांदळवनांच्या मुळावर घाव घातला जाणार आहे. वीज वाहिनी टाकण्यासाठी हायकोर्टाकडून कांदळवन तोडण्याची परवानगी अदानीला मिळाली असून वसई खाडीजवळील 209 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई इन्फ्रा लिमिटेडच्या वतीने दोन ट्रान्समिशन सबस्टेशन्समध्ये जोडण्यासाठी 80 किमी लांब उच्च व्होल्टेज डायरेक्ट करंट लाईन टाकण्यात येणार आहे. ही लाईन मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून जाणार आहे. वसई खाडी येथील एक किमी भागातील 209 कांदळवने यामुळे बाधित होणार असून ती तोडण्याची परवानगी मिळावी यासाठी कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी प्रकल्पाचे सार्वजनिक महत्त्व अधोरेखित करत खंडपीठाने परवानगी दिली.
न्यायालयाने आदेशात काय म्हटले…
शाश्वत विकासाची गरज आणि पर्यावरण जपण्यासाठी आवश्यकता यांच्यात समतोल राखला गेला पाहिजे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि उपनगरांना अतिरिक्त वीज पुरवठा करणे शक्य होईल आणि शहराच्या वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण होईल. प्रस्तावित प्रकल्पाचे सार्वजनिक महत्त्व लक्षात घेता मुंबई शहर आणि उपनगरातील वीज ग्राहकांना फायदा होईल.