![Varun Sardesai](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Varun-Sardesai-696x447.jpg)
वांद्रे (पू.) येथील गौतम नगर येथील समता सहकारी संस्थेतील रहिवाशांना वांद्रे (पू.) परिसरातच घरे देण्याच्या मागणीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या घरांसाठी येत्या 13 तारखेला काढण्यात येणाऱ्या लॉटरीच्या सोडतीला स्थगिती देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांना आज दिले.
आमदार वरुण देसाई यांनी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. वांद्रे (पू.) विधानसभा मतदारसंघात गौतम समता सहकारी गृहनिर्माण संस्थेस पुनर्वसनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लॉटरी काढून दूरवरच्या परिसरात स्थलांतरित करण्यात येत आहे. या रहिवाशांना मालाड आप्पापाडा येथे जबरदस्तीने स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण या ठिकाणी एकूण 138 रहिवासी 1 जानेवारी 1995 पूर्वीपासून वास्तव्य करीत आहेत. या सर्वांकडे वास्तव्याचे पुरावे आहेत. सार्वजनिक विभागाकडून 6 फेब्रुवारी 25 रोजी लॉटरी सोडत काढण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यामुळे ही लॉटरी सोडत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे गौतम सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांचे वांद्रे (पू) येथील दोन किमी आसपासच्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रिक्त असलेल्या सदनिकांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती वरुण सरदेसाई यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
आमदार वरुण सरदेसाई यांनी शिवेंद्रराजे यांची भेट घेऊन भूमिका मांडली. हायकोर्टाच्या प्रकल्पाला विरोध नाही, पण स्थानिक वांद्रेकरांना वांद्रय़ातच घरे द्यावीत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची 13 तारखेची लॉटरी सोडत स्थगित करण्याची मागणी आम्ही केली आहे. त्यावर शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लॉटरी स्थगित करू असे सांगितले.