रिक्षा, टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशनचा गुंता कायम; भाडे आकारणीवरून चालक, प्रवाशांमध्ये वादाचे प्रमाण वाढले

रिक्षा टॅक्सीची दरवाढ होऊन अकरा दिवस उलटले तरी मीटर रिकॅलिब्रेशनचा गुंता सुटलेला नाही. भाडेवाढीबाबत संभ्रमाचे वातावरण कायम राहून रिक्षाटॅक्सीचालक आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. मीटर रिकॅलिब्रेशन प्रक्रियेतील विलंबामुळे चालकांना प्रवाशांकडून नवीन दराने भाडे घेणे मुश्कील बनले आहे. याचदरम्यान मीटर रिपेअरिंग असोसिएशनने योग्य मोबदला मिळत नसल्याच्या मुद्दय़ावरून कॅलिब्रेशनचे काम करण्याचा पवित्रा घेतला आहे.

राज्य परिवहन विभागाच्या धोरणानुसार चालकांना एकतर मीटर रिकॅलिब्रेशन करणे किंवा क्यूआर कोडवर आधारित भाडेपत्रक दाखवणे आवश्यक आहे. रिकॅलिब्रेशनच्या प्रक्रियेतील विलंबामुळे चालकांना प्रवाशांकडून नवीन दराने भाडे आकारताना अडचण येत आहे. हा गुंता कधी सुटतोय, याकडे प्रवाशांसह रिक्षा-टॅक्सीचालकांचे लक्ष लागले असतानाच मीटर रिपेअरिंग असोसिएशनने मीटर कॅलिब्रेशनचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. मेहनतीच्या तुलनेत पैसे मिळत नसल्याने मीटर दुरुस्ती करणाऱया दुकानदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. 2021 मध्ये मीटर रिपेअरिंगसाठी 700 रुपये मिळायचे. त्यातील 280 रुपये मीटरमध्ये चिप टाकण्यास, तर 100 रुपये टेस्टिंगला मीटर पाठवण्यावर खर्च होतात. तसेच दुकानातून मीटर टेस्टिंगला पाठवण्यास 40 रुपये मोजावे लागतात. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आता चार वर्षांपूर्वीच्या 700 रुपयांच्या दरात मीटर क@लिब्रेशन शक्य नाही. 700 रुपयांत मीटर पासिंग करून न दिल्यास कारवाईचा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. या कारवाईचा विरोध करीत मीटर रिपेअरिंग असोसिएशनने क@लिब्रेशनचे काम थांबवण्याचा पवित्रा घेतला आहे.

परिवहन विभागाचे धोरण अन्यायकारक

परिवहन विभाग आणि मीटर उत्पादक आमच्यावर कमी पैशांमध्ये काम करण्यासाठी दबाव टाकत आहे. आम्ही मीटर क@लिब्रेशनसाठी 700 ऐवजी 800 रुपयांची मागणी केली आहे. मीटर टेस्टिंग लॅबच्या कमतरतेमुळे आम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याकडे दुर्लक्ष करून कारवाईचा बडगा उगारणे अन्यायकारक आहे. परिवहन विभागाच्या याच धोरणाला विरोध म्हणून आम्ही मीटर कॅलिब्रेशनचे काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे, असे मीटर रिपेअरिंग असोसिएशनचे सेक्रेटरी अरुण कळंबे यांनी सांगितले