10 हजार रुपयांची लाच प्रकरणात पोलिसाला अटक

दहा हजार रुपयांची लाचप्रकरणी पोलीस हवालदारला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने अटक केली. विशाल यादव असे त्या पोलिसाचे नाव असून तो आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोलमध्ये काम करतो. व्यवसायात मदत करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केल्याचे तपासात समोर आले आहे.

तक्रारदार याचा तंबाखू आणि सुपारीचा होलसेलचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी विशाल हा तक्रारदार यांना भेटला होता. त्याने कारवाई न करण्यासाठी आणि व्यवसायात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली. गुडलक म्हणून पाच हजार रुपयेदेखील घेतले होते. तसेच दर महिन्याला दहा हजार रुपये हत्या देण्याची मागणी केली. जर लाच दिली नाही तर कारवाई करू अशी धमकी दिली. याप्रकरणी तक्रारदार याने एसीबीकडे धाव घेतली. त्या तक्रारीची गंभीर दखल एसीबीने घेतली. एसीबीने सापळा रचून विशालला रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.