![tanaji sawant son](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/tanaji-sawant-son-696x447.jpg)
सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे मिंधे गटाचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांच्या प्रकरणात पुन्हा स्पष्ट झाले आहे. खासगी विमानाने बँकॉकला निघालेल्या ऋषीराज तानाजी सावंतला रोखण्यासाठी देशाच्या हवाई हद्दीतच विमान वळवून पुन्हा पुणे विमानतळावर लॅण्ड करण्यात आले. यासाठी साडेचार तास पुणे पोलीस, सरकारी यंत्रणा, एअर ट्रफिक पंट्रोल (एटीसी) यांना वेठीस धरले, दबाव टाकण्यात आला. दरम्यान, एका आमदाराच्या हट्टासाठी बँकॉक हवाई मार्गे जाणाऱ्या विमानांचे मार्ग बदलले, तर काही विमाने रोखण्यात आली. त्यामुळे पुणे, मुंबई, केरळ, विशाखापट्टणम विमानतळावर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले, मनस्ताप झाला.
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याने प्रवीण उपाध्याय आणि संदीप श्रीपती वसेकर या मित्रांसह सोमवारी दुपारी 4.30च्या सुमारास खासगी विमानाने पुणे विमानतळावरून बँकॉकला उड्डाण केले. मुलाच्या प्रतापामुळे तानाजी सावंत हादरले. त्यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर तानाजी सावंत यांनी मोठय़ा मुलासह 10 ते 12 जणांना घेऊन पोलीस आयुक्तालय गाठले आणि सहपोलीस आयुक्त रंजनपुमार शर्मा यांच्या दालनात प्रवेश करून मुलाला बँकॉकला पोहोचू देऊ नका, विमान रोखा, अशी मागणी केली.
कॅप्टनने सांगितले होते असे विमान वळवता येणार नाही, पण…
सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी विमान बँकॉकला न नेता, पुन्हा माघारी आणण्याच्या सूचना कॅप्टनला दिल्या. मात्र, अशा पद्धतीने कोणतीही इमर्जन्सी नसताना विमान वळविता येणार नसल्याचे कॅप्टनने सांगितले. त्यानंतर, तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना गळ घालून मुलाला पुन्हा पुण्यात आणण्याची विनंती केली.