मेट्रो-2अ व मेट्रो-7 वर दररोजची प्रवासी संख्या अडीच लाखांवर

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ करणाऱ्या महामुंबई मेट्रोने 15 कोटी प्रवासीसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. मेट्रो-2अ आणि मेट्रो-7 या दोन मार्गिकांवर तब्बल 15 कोटी 84 लाख 81 हजार 859 इतक्या प्रवाशांची नोंद झाली आहे. महामुंबई मेट्रोने अवघ्या तीन वर्षांत प्रवासीसंख्येचा हा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. दहिसर ते डी. एन. नगरपर्यंतच्या 18.6 किमी लांबीच्या मेट्रो-2अ मार्गिकेवर 17 स्थानके आहेत, तर अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्वपर्यंतच्या 16.5 किमी लांबीच्या मेट्रो-7 मार्गिकेवर 13 स्थानके आहेत. या दोन मार्गिकांवर एकत्रितरीत्या 2 लाख 69 हजारांवर मुंबईकर नियमित प्रवास करतात. 2 एप्रिल 2022 रोजी दोन्ही मार्गिका प्रवासी सेवेत दाखल झाल्या आणि मुंबईकरांना वाहतूककोंडीपासून मोठा दिलासा मिळाला. प्रवासाचा बराच वेळ वाचल्याने दोन्ही मार्गिकांवरील प्रवासीसंख्येत वेगाने वाढ होत आहे. गेल्या वर्षी 29 मे रोजी प्रवासीसंख्या 10 कोटींवर पोहोचली होती. 7 ऑक्टोबर 2024 रोजी एका दिवसात विक्रमी 2 लाख 92 हजार जणांनी प्रवास केला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण दोन्ही मार्गिकांवर मेट्रो सेवा चालवत आहे.