राष्ट्रपती भवनात आज लगीनघाई; कडक सुरक्षेत पार पडणार विवाह सोहळा

राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच उद्या 12 फेब्रुवारीला विवाह सोहळा होत आहे. राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्समध्ये पहिल्यांदाच शहनाईचा आवाज गुंजणार आहे. सीआरपीएफ अधिकारी महिलेचे नाव पूनम गुप्ता आहे. पूनम गुप्ता सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत तैनात आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट अवनीश कुमार यांच्यासोबत पूनम लग्नगाठ बांधणार आहे.

या लग्नसोहळ्याला फक्त दोन्ही कुटुंबातील जवळचे लोकच उपस्थित राहणार आहेत. प्रोटोकॉलचा हवाला देत पूनम आणि अवनीश कुमार यांच्या कुटुंबीयांनी या विवाह सोहळ्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. पूनम गुप्ता हिने 2024 मधील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सीआरपीएफच्या महिला तुकडीचे नेतृत्व केलेले आहे. पूनम गुप्ता गणित विषयात पदवीधर असून इंग्रजी साहित्यात मास्टर्स केलेले आहे. पूनमने ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातून बी एडही पूर्ण केले आहे.

पाहुण्यांची तपासणी
या विवाह सोहळ्याला केवळ वधू आणि वर यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनाची सुरक्षा लक्षात ठेवून सर्व पाहुण्या मंडळीची एन्ट्रीआधीच कसून तपासणी केली जाईल.

राष्ट्रपती भवनबद्दल जाणून घ्या
राष्ट्रपती भवन 300 एकरमध्ये पसरलेले आहे. यात चार इमारती असून एकूण 340 खोल्या आहेत. इटलीच्या क्विरनल पॅलेसनंतर जगातील हे सर्वात मोठे राष्ट्राध्यक्षाचे महल आहे. याशिवाय, यात प्रसिद्ध अमृत उद्यान, एक म्युझियम आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर सी. राजगोपालचारी, 1948 मध्ये राष्ट्रपती भवनात राहणारे पहिले भारतीय व्यक्ती होते. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात पहिल्यांदाच लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे.