किती सोपं आहे बोलायला की, जाऊ द्या, माफ करून टाका; जितेंद्र आव्हाड यांची सुरेश धस यांच्यावर टीका

सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. पण या पोलिसांना माफ करा असे विधान भाजप आमदार सुरेश धस यांनी केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी किती सोपं आहे बोलायला की, जाऊ द्या, माफ करून टाका असे म्हणत सुरेश धस यांना टोला लगावला आहे. तसेच सोमनाथ सुर्यवंशीच्या आईंनी विचारलेला प्रश्न योग्यच आहे असेही आव्हाड म्हणाले.

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली. यावर आव्हाड म्हणाले की, हृदयामध्ये कालवाकालव होत असलेल्या आईचे उत्तर ऐकून आपल्याही डोळ्यात अश्रू येतात. आईचं भडकलेलं माथं तिच्या शब्दा शब्दात दिसतं. किती सोपं आहे बोलायला की, जाऊ द्या, माफ करून टाका ! जिने आपल्या पोटाचा गोळा हरवलाय… आपल्या म्हातारपणीचा आधार गमावलाय. तिलाच हा उपदेश देणे किती मूर्खपणाचे लक्षण आहे. आपल्या घरातील कोणी गमावले तर हीच भाषा आपण बोलू का? आईने विचारलेला प्रश्न योग्यच आहे.

तसेच ज्या मातेने अत्यंत गरिबीत सोमनाथला शिकवले अन् आयुष्याची आशा म्हणून त्याच्याकडे बघितलं; ती आशा चक्काचूर होत असताना ती बघतेय अन् तरीही ती लढण्याची हिमंत दाखवतेय. हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आई… माऊली, तुझ्या हिमतीला सलाम ! तू लढ, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत ! असेही आव्हाड म्हणाले.