बारावीच्या परीक्षेला मंगळवार (11 फेब्रुवारी 2025) पासून प्रारंभ झाला. आज पहिला पेपर इंग्रजीचा होता. कोकण बोर्डामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी 61 केंद्रांवर 24 हजार 541 परीक्षार्थी बसणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 38 केंद्रांवर 16 हजार 054 विद्यार्थी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 23 केंद्रांवर 8 हजार 487 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
आज सकाळी 11 वाजता बारावीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरला सुरूवात झाली. पहिला पेपर दुपारी दोन वाजता संपला. बारावी परीक्षेच्या काळात कॉपीसारखे गैरप्रकार घडू नयेत याकरीता कोकण बोर्डाने 7 भरारी पथके तैनात ठेवली आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाची भरारी पथकेही पाहणी करणार आहेत. दरम्यान ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून चिपळूण सारख्या संवेदनशील परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाची नजर राहणार आहे. परीक्षाकेंद्रावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.