![aaditya1](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/aaditya1-696x447.jpg)
पोलीस आणि प्रशासनाने पर्यावरण आणि वाढत्या प्रदूषणाचे कारण देत मुंबईत माघी गणशोत्सवातील मोठ्या गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी गणेश मंडळांना रोखल्याने यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, या मुद्द्यांवर रोखठोक मत व्यक्त केले. भाजपच्या राज्यात गणेश मुर्तींचे विसर्जन रोखण्यात आले, यासारखी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
गणपती विसर्जनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरही राज्य सरकारने अध्यादेश काढला, बिल आणलं आणि ते बदलून घेतलं. याबाबतचा अंतरीम आदेश आल्यानंतरही 12 दिवस उलटून गेले आहेत. 30 जानेवारीला याबाबतचे आदेश आल्यानंतर मुंबई महापालिकेने नेमकी काय तयारी केली, असा सवालही त्यांनी केला. पोलिसांनी या गणेश मंडळांची बैठक बोलावली होती का, काही पर्यायी व्यवस्था केली होती का, आमच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर कृत्रिम तलाव तयार करण्यात आले. मात्र, त्या तलावात मोठ्या गणेशमुर्तींचे विसर्जन होणार आहे का? असा सवालही त्यांनी केला.
भाजप हिंदुत्वाचा वापर फक्त निवडणुकीसाठी करत आहे. त्यानंतर हिंदुकडे भाजप दुर्लक्ष करते. याची अनेक उदाहणे दिसून आली आहे. मिंधेंचे आमदार असलेल्या सदा सरवणकर यांनी 2023 मध्ये गणेशोत्सवातील मिरवणुकीवर बंदूक रोखली होती. त्यांनी पोलीस ठाण्यासमोरही गोळी झाडली होती. तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, गोळी झाडली गेली आहे. मात्र, कोणी झाडली हे स्पष्ट झालेले नाही. त्याचा अभ्यास सुरू आहे. सरवणकर यांच्यावर युएपीएसारखा कायदा लागू करण्याची गरज होती. त्यांनी हिंदूच्या मिरवणुकीवर बंदूक रोखली होती. मात्र, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारने सरवणकर यांनी सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष केले, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
निवडणूकीच्या काळात मतदानाच्या आदल्या दिवशी वफ्फ बोर्डाने सिद्धीविनायक मंदिराची जागा मागितल्याचे भाजपच्या सोशल मिडीयावरील गँगने म्हटले होते. एका बाजूला गणेश मिरवणुकीवर बंदूक रोखणाऱ्या आणि अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीला सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष करण्यात येते. दुसरीकडे मते मिळवण्यासाठी आणि हिंदुना भीती दाखवण्यासाठी वफ्फ बोर्डाची खोटी माहिती पुरवण्यात येते. आता तर गणेश मुर्तींना विसर्जनासाठी अडवल्याने अद्यापही माघी गणपतींचे विसर्जन झालेले नाही. असे दुर्दैव आपण याआधी राज्यात कधाही बघितलेले नाही.
यातून हे स्पष्टपणे दिसते की, मराठमोळे हिंदू सण भाजपला पुसून काढायचे आहेत. त्यामुळे भाजप गप्प आहे. भाजपची हिंदुत्वाबाबतची दुटप्पी भूमिका जगजाहीर आहे. गोव्यात बीफ पार्टी करणारी भाजप आपल्याला हिंदुत्व शिकवत आहे. अशा अनेक बातम्या आहेत. हिंदूवर अत्याचार करणाऱ्या बांगलादेशींची क्रिकेट खेळत आहेत. त्यांना दोन लाख टन तांदूळ पुरवण्यात येत आहे. बांगलादेशबाबत वक्तव्य करण्याव्यतिरीक्त भाजपने काय केले आहे. एकाही बांगलादेशी किंवा रोहिंग्णया मुसलमानांना देशाबाहेर काढण्यात आलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या राज्यात गणेश विसर्जन रोखण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. आगामी गणेशोत्सवात पीओपीच्या मुर्त्यांबाबत सरकारचे काय धओरण असेल, पर्यावरणासाठी पीओपी मुर्त्यांवर बंदी घालायची असेल तर त्याला पर्याय काय, यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी माहिती देण्याची गरज आहे. आता गणेश मुर्त्या विसर्जनासाठी पोलिसांच्या माध्यमांतून मंडळांवर दबाव टाकण्यात येत आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी मंडळांशी चर्चा केली होती काय, सरकारने यात भूमिका घेण्याची गरज आहे. पर्यावरणाची समस्या, विसर्जनानंतर गणेशमुर्त्यांचा अवमान या विषयांवर मार्ग काढता आला असता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मंडळाशी चर्चा केलीच नाही. आता आगामी गणेशोत्सवासाठी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, ही आमची मागणी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मिंधे गटाच्या आगाऊ भूमिकेमुळे भाजप मिंधे गटाला दूर करत आहे. त्यांच्यातील ही भांडणे जनतेच्या समस्यांसाठी नसून त्यांच्या स्वार्थासाठी आहे. त्यामुळे आता भाजप त्यांना दुर करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. बीड आणि परभणीच्या घटना दुर्दैवी आहे. अनेक पुरावे देऊनही सरकारमधून काहीही कारवाई होताना दिसत नाही. अद्यापही पोलिसांना आका सापडत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब यांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी. राज्यात महामानवाचा अपमान होऊनही भाजप सरकार गप्प आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.