तानाजी सावंत यांच्या मुलासाठी रान पेटवणाऱ्या पोलिसांना कृष्णा आंधळे सापडत नाही, सुप्रिया सुळे यांची टीका

तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाला होता. पण पोलिसांनी आपली सुत्र हलवली आणि त्यांचा मुलगा बँकॉकला जाण्यापासून रोखले. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलासाठी पोलिसांनी रान पेटवलं पम त्यांना संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपी कृष्णा आंधळे सापडत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच गृहखात्याने असेच मन लावून काम केलं तर कृष्णा आंधळे सापडले असेही सुळे म्हणाल्या.

आज माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील गृहखाते आणि पोलिस किती तत्पर आहेत याचे उदाहरण काल पहायला मिळाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी मंत्रीमहोदयांच्या मुलाचे विमान हवेतल्या हवेत परत बोलावून राज्यातील यंत्रणेने आपली कुशलता सिद्ध केली. परंतु याच यंत्रणेला मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेली साठ दिवसांपासून सापडत नाही, ही बाब पटण्यासारखी नाही.
तसेच कालच्या घटनेत वरपासून खालपर्यंत यंत्रणा हलली आणि सदर नेत्याच्या पुत्राचे विमान हवेतल्या हवेत परत फिरले. अशाच पद्धतीने गृहखात्याने मन लावून काम केले तर कृष्णा आंधळे गजाआड होईल. अतिविशिष्ट लोकांच्या किरकोळ घरगुती कामांसाठी मनापासून झटणारे गृहखाते सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अशीच तत्परता का दाखवत नाही? असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला.