![Gold](https://www.saamana.com/wp-content/uploads/2022/10/Gold-696x447.jpg)
जगभरातील अर्थव्यवस्था आणि जागतिक शेअर बाजारात संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाचा जगाला फटका बसत आहे. ट्रम्प सातत्याने अनेक देशांना टेरिफ वाढवण्याच्या धमक्या देत आहे. त्यांच्या या धोरणाचा जागतिक अर्थव्यवस्था आणि जागतिक शेअर बाजाराला फटका बसत असला तरी सोन्याला नवी झळाळी मिळाली आहे. या अनिश्चितततेच्या आणि अस्वस्थतेच्या काळात अनेक देशांमध्ये सोने खरेदीसाठी चढाओढ सुरू झाली आहे.
हिंदुस्थानसह अनेक देश पूर्ण क्षमतेने सोने खरेदी करत आहे. चीन, तुर्की आणि युरोपीय देशांच्या बाबतीतही असेच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बँका भविष्यासाठी तयारी करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच जग डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी करत असल्याचाही चर्चा आहे.
सोन्यातील गुंतवणूक ही नेहमी फायद्याची असते. तसेच त्यात चांगल्या परताव्याची हमीही असेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार विश्वासाने सोने खरेदी करतात. सोने ही नेहमी मूल्य वाढत जाणारी संपत्ती आहे. तसेच आर्थिक अनिश्चिततेपासून संरक्षणाचे प्रतीक आहे. गुंतवणूकदारांप्रमाणे आता विविध देशांमध्येही सोने खरेदीसाठी चढाओढ दिसून येते. गेल्या वर्षी विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सर्वाधिक सोने खरेदी केले. गेल्या तीन वर्षांपासून जगातील मध्यवर्ती बँका दरवर्षी 1000टनांपेक्षा जास्त सोने खरेदी करत आहेत. 2024 मध्ये जगातील बँकांनी 1045 टन सोने खरेदी केले. 2024 मध्ये सोने खरेदी करणाऱ्या देशांमध्ये पोलंडची नॅशनल बँक पहिल्या क्रमांकावर राहिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दुसऱ्या स्थानावर आणि सेंट्रल बँक ऑफ तुर्की तिसऱ्या स्थानावर आहे.
आपल्या देशातील RBI ने देखील 2024 मध्ये सोन्याचा साठा 72.6 टनांनी वाढवला आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या पोलंडच्या नॅशनल बँकेने 2024 मध्ये 90 टन सोने खरेदी केले आहे. डिसेंबर 2024 च्या अखेरीस आरबीआयकडे असलेल्या सोन्याचा नवीनतम साठा 876.18 टन होता, ज्याची किंमत 66.2 अब्ज डॉलर होती, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 48.3 अब्ज डॉलर किमतीच्या 8.3.58 टनांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच एका वर्षात 72.6 टन खरेदी करण्यात आली.
अनेक देशांकडून सोनेखरेदीला प्राधान्य देण्यामागे अनेक भू-राजकीय कारणे आहेत. ट्रम्प यांचे पुनरागमन, ट्रम्प यांची अस्थिर व्यापार धोरणे, व्यापारी शस्त्र म्हणून शुल्काचा वापर, हमास-इस्रायल युद्ध, युक्रेन-रशिया युद्ध, साथीच्या रोगाच्या पुनरागमनाची भीती ही कारणे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता आणि संशयाचे वातावरण निर्माण करतात. या धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी, जगभरातील बँका सोने खरेदी करत आहेत. आता 2025 सुरू होऊन महिन्याभरापेक्षा जास्त काळ उलटला आहे. या काळात सोन्याच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जगभरात डॉलरचे मूल्य वधारत असल्याने इतर देशांच्या चलनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे जग डॉलरला पर्याय उभा करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. डॉलर बदलण्याच्या पर्यायाबाबतच्या चर्चांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. अशा कोणत्याही प्रयत्नांवर भारी शुल्क लादण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे सोन्याच्या किमतीत आणखी वाढ झाली आहे. गुंतवणूकदार त्यांच्या व्यापार धोरणांमुळे चिंतेत आहेत. गुंतवणूकदारांना भीती आहे की त्यांच्या धोरणांमुळे चलनवाढीचा दबाव वाढू शकतो. हे टाळण्यासाठी, जगातील देश एक धोरणात्मक मालमत्ता म्हणून सोने खरेदी करत आहेत.