शेअर बाजारात भूकंप; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भीतीने जबरदस्त हादरे, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

share-market-fall

शेअर बाजार सध्या मोठ्या दबावातून जात आहे. बाजारासाठी या महिन्यात तब्बल टार गूड न्यूज आल्या आहेत. मात्र, बाजारावर त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम झालेला नाही. बाजाराची घसरण सुरूच आहे. यातून सध्यातरी बाजार सावरण्याची चिन्ह नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मंगळवारी बाजारात भूंकप झाला. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर धारातिर्थी पडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्या धोरणांच्या भीतीमुळे जागतिक आणि हिंदुस्थानी शेअर मार्केटला जबरदस्त हादरे बसत आहेत. आजच्या या घसरणीत गुंतवणूकदारांचे सुमारे 10 लाख कोटी बुडाले आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा देत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. बाजार या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी शक्यता होती. मात्र, बाजारात घसरण सुरूच आहे. कोणत्याही चांगल्या बातमीलाही बाजार सकारात्मक प्रतिसाद देत नाही आहे. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. दोन दशकांत बाजाराने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. अनेकदा बाजार क्रॅशदेखील झाला आहे. मात्र, आजच्यासारखी बिकट परिस्थिती बाजाराने याआधी बघितली नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

बाजाराची सुरुवात होताच मंगळवारी मोठी घसरण झाली. त्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1200 अंकांपेक्षा जास्त घसरला. तर निफ्टी 370 अंकांनी घसरला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपये बुडाले. कोरोना काळातही बाजार क्रॅश झाला होता. मात्र, काही महिन्यांतच बाजार पुन्हा एकदा सर्वोच्च पातळीवर पोहोचला. बाजाराने ऑल टाईन हाय गाठला होता. आता बाजार चांगल्या बातमीलाही सकारात्मक प्रतिसाद देत नाही.दुपारी 3.20 पर्यंत निफ्टीचा निर्देशांक 23,060.95 वर व्यवहार करत होता. त्यात 320.65 अंकांची घसरण झाली होती. तर बँक निफ्टी 49,409.40 अंकांवर होता. त्यात 571.60 अंकांची घसरण झाली होती.

या घसरणीचा सर्वात जास्त फटका लहान गुंतवणूकदारांना बसला आहे. जेव्हा निर्देशांक 10 टक्क्यांहून अधिक घसरतो, तेव्हा स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सला सर्वाधिक फटका बसतो. स्मॉल कॅप श्रेणीतील सर्व शेअर्सच्या किमती निम्म्या झाल्या आहेत, तर मिडकॅप शेअर्समध्येही 50 टक्के घसरण झाली आहे. सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफा वसुलीसाठी मोठी विक्री दिसून येत आहे. त्यामुळेही बाजाराच्या घसरणीला हातभार लागत आहे.

ट्रम्प यांच्या धोरणामुळे अनेक परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार बाजारातील त्यांचे पैसे काढून घेत अनेरिकेत गुंतवत आहे. त्याचाही बाजाराला मोठा फटका बसला आहे. निफ्टीचा ऑल टाईम हाय म्हणजेच सर्वकालीन उच्चांक 26277 आहे. त्या टप्प्यापासून निर्देशांक 23000 पर्यंत घसरला आहे. म्हणजेच त्यात सुमारे 14 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर सेन्सेक्स 76000 अंकांपर्यंत घसरला आहे. त्यात सुमारे 12000 अंकांनी घसरण झाली आहे. छोट्या गुंतवणूकदारांनी कोरोनानंतर 2 ते 3 वर्षात केलेली सर्व गुतंवणूक फक्त 4 महिन्यांतच संपली आहे.

अनेक छोटे गुंतवणूकदार होते की त्यांचे पोर्टफोलिओ एकेकाळी 30 टक्क्यांपर्यंत नफ्यात होते. मात्र, आता ते 50 टक्क्यांपर्यंत तोट्यात गेले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांचा हिंदुस्थानी बाजारातूम भ्रमनिरास झाला आहे, ते सतत विक्री करत आहेत, ज्यामुळे बाजार सावरू शकत नाही. तसेच रुपयाच्या तुलनेत डॉलर सतत मजबूत होत आहे. त्यामुळे ही घसरण अधिक तीव्र होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प जगाला सतत टॅरिफबद्दल धमक्या देत आहेत.त्याचा मोठा परिणाम बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. तिसऱ्या तिमाहीचे निकाल देखील बाजाराला त्रास देत आहेत. ट्रम्प यांच्यामुळे जागतिक आणि हिंदुस्थानी बाजारात भूकंप होत असताना अमेरिकन बाजारात तेजीचा कल दिसून येत आहे. जोपर्यंत परदेशी गुंतवणूकदार हिंदुस्थानी बाजारात पुन्हा मोठी गुतंवणूक करत नाहीत, तोपर्यंत बाजारात घसरण कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.