उन्हाळ्यात दह्याचा ‘हा’ फेसपॅक तुम्हाला ठेवेल गारेगार!

उन्हाळा आणि गारेगार पदार्थ यांचं एक अतूट समीकरण आहे. उन्हाळा म्हटल्यावर पटकन डोळ्यांसमोर आईस्क्रीम आणि तत्सम पदार्थ येतात. परंतु याच उन्हाळ्यात आपण त्वचेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना घरच्या घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांमधूनच आपण त्वचेचे संवर्धन करु शकतो. यातच आपल्या घरामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात हमखास आढळला जाणारा पदार्थ म्हणजे दही.
उन्हाळ्यात त्वचेसाठी दह्याचे महत्व खूप मोठे आहे. दह्यामध्ये असलेल्या लॅक्टिक अॅसिड मुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. मृत त्वचा निघून गेल्यामुळे दह्यामुळे त्वचा चमकदार होते. त्यासोबतच दह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी हे त्वचेच्या रक्षणासाठी उत्तम मानले जाते. दह्यामध्ये असलेले कॅल्शियम डार्क सर्कलसाठी अतिशय उपयोगी मानले जाते. मुख्य म्हणजे दह्यातील थंडाव्यामुळे उन्हामुळे भाजलेली त्वचा थंड राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात प्रदूषणामुळे चेहऱ्यावर अनेक डाग पडतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत. कधी कधी त्यांच्यामुळे चेहऱ्याचा नूर निघून जातो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दही वापरणे केव्हाही हितकारक आहे. 
 
असा करा दह्याचा फेसपॅक

दही – 2 टेस्पून
मुलतानी माती – 2 टीस्पून
कोरफड जेल – 1 टीस्पून

कृती- एका वाडग्यात हे तीन घटक एकत्र करून पेस्ट बनवा.
आता ते चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ राहू द्या.
काही वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवा.
 
दह्याच्या या फेसपॅकमुळे काही वेळातच चेहरा तजेलदार दिसेल. तसेच दह्यामुळे त्वचेलाही चांगलाच थंडावा मिळतो. 
(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)