![shardul thakur](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/03/shardul-thakur--696x447.jpg)
पहिल्या डावात आघाडी घेण्याचे हरयाणाचे मनसुबे शार्दुल ठाकूरच्या भेदक आणि भन्नाट माऱयापुढे नेस्तनाबूत झाले. काल 5 बाद 263 अशा सुस्थितीत असलेल्या हरयाणाचा अर्धा संघ अवघ्या 38 धावांत एकटय़ा शार्दुल ठाकूरने गुंडाळला आणि मुंबईला 14 धावांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या डावात धडपडलेल्या आघाडीवीरांनी खणखणीत खेळ्या करत मुंबईला तिसऱया दिवसअखेर 4 बाद 278 अशी मजल मारून देत आपली आघाडी 292 पर्यंत नेली. या आघाडीमुळे रणजी विजेत्या मुंबईने आपली पावले उपांत्य फेरी प्रवेशाच्या दिशेने टाकली आहेत. तिसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे 88, तर शिवम दुबे 30 धावांवर खेळत होता.
पहिल्या दिवशी मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी, त्यानंतर संकटमोचक म्हणून शम्स मुलानी (91) आणि तनुष कोटियनने (97) केलेल्या 165 धावांच्या भागीमुळे मुंबईला अनपेक्षितपणे 315 अशी मजल मारता आली होती, तर हरयाणाने मुंबईच्या गोलंदाजांना झुंजवत कर्णधार अंकित कुमारच्या 136 धावांच्या खेळीच्या जोरावर दुसऱया दिवसअखेर 5 बाद 263 अशी मजल मारत सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र तिसऱया दिवशी मुंबईने गोलंदाजी आणि फलंदाजीत आपली दहशत दाखवत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. काल एक विकेट टिपणाऱया शार्दुलचे चेंडू बंदुकीच्या गोळीप्रमाणे हरयाणाच्या फलंदाजांना टिपत गेले आणि हरयाणाचा उर्वरित अर्धा संघ शार्दुलनेचे गारद करत मुंबईला 14 धावांची आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावात आघाडी घेऊन मनोधैर्य उंचावलेला मुंबईचा संघ फलंदाजीला उतरला, पण आकाश आनंग (10) आणि आयुष म्हात्रे (31) मुंबईची पन्नाशी लागण्याआधीच माघारी परतले, पण त्यानंतर सिद्धेश लाडचा (43) संयमी खेळ आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने सूर्यकुमार यादवच्या (70) साथीने चौथ्या विकेटसाठी केलेल्या 129 धावांच्या भागीने मुंबईची स्थिती बळकट केली. गेल्या काही सामन्यांत अपयशी ठरत असलेल्या सूर्यकुमारने 70 धावांच्या झंझावाती खेळीत 2 षटकार आणि 8 चौकार खेचत मुंबईला सामन्यावर घट्ट पकड मिळवून दिली.