![neehar (90)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-90-696x447.jpg)
उत्तराखंड राज्यातील मुन्सियारी एक छोटे आणि अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. हिवाळ्यामध्ये हे हिल स्टेशन बर्फाने आच्छादलेले असून, याचे सौंदर्य हे नजरेस सुखावणारे आहे. बर्फाच्छादित पर्वत रांगांमुळे या ठिकाणाला उत्तराखंडचे ‘मिनी काश्मीर’ म्हटले जाते. मुन्सियारी हे तिबेट आणि नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. मुन्सियारी नैसर्गिक सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते.
बिर्ती धबधबा – मुन्सियारीपासून 35 किमी अंतरावर आहे. हे कुमाऊं खोऱ्यातील सर्वोत्तम पिकनिक स्पॉट्सपैकी एक आहे. तुम्हाला साहसाची आवड असेल तर तुम्हाला हे ठिकाण नक्कीच आवडेल. तुम्हाला या ठिकाणी पोहोचण्यासाठी छोटा ट्रेक करूनच तुम्हाला जावे लागेल. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. विविध प्रकारचे पक्षी आणि फुलपाखरे येथे तुम्हाला पाहायला मिळतील.
कलामुनी मंदिर – मुन्सियारीच्या 14 किमी पुढे आणि 9600 फूट उंचीवर वसलेले, हे शहरातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. काली देवीचे प्राचीन मंदिर असल्याने हे स्थानिक लोकांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र मानले जाते. या ठिकाणी भेट देणारे लोक एक मनोरंजक परंपरा पाळतात ज्यानुसार भाविकांना त्यांच्या देवतेची प्रार्थना करताना मंदिर परिसरात घंटा वाजवावी लागते.
थमरी कुंड – थमरी कुंड कुमाऊं खोऱ्यातील सर्वात आकर्षक गोड्या पाण्यातील तलावांपैकी एक आहे. मुख्य शहरापासून या तलावापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 8 तास लागतात. तलावापर्यंत पोहचायला बराच वेळ लागतो, त्यामुळे सकाळी लवकर सुरुवात करणे उचित आहे. दाट अल्पाइन वृक्षांनी वेढलेला सरोवर तुम्हाला दिसतो. या ठिकाणी ट्रेक करताना तुम्हाला हरणंही दिसतात.
माहेश्वरी कुंड – या प्राचीन तलावाला एक पौराणिक इतिहास जोडलेला आहे. या कुंडाच्या ठिकाणाहून पंचाचुली पर्वत रांगेचे विहंगम चित्तथरारक दृश्य पाहायला मिळते.
मडकोट – मडकोट हे मुन्सियारीपासून 5 किमी अंतरावर वसलेले एक छोटे गाव आहे. हे त्याच्या नैसर्गिक गरम झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की, या ठिकाणाचे गरम पाण्यामध्ये अंघोळ केल्यास, त्वचेची जळजळ, अंगदुखी, संधिवात आणि इतर अनेक आजार बरे होतात.