शेतकरी हल्ला प्रकरणाचा भंडाफोड, प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावानेच केला कोयत्याने हल्ला

कल्याणच्या लक्ष्मी मार्केटमध्ये एका शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रॉपर्टीसाठी सख्ख्या भावानेच भावावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जखमी बारकू मढवी यांचा भाऊ कृष्णा याला बेड्या ठोकल्या आहेत.

लक्ष्मी मार्केटमध्ये पहाटे सहा वाजता जनावरांसाठी चारा घेण्यासाठी बारकू मढवी आले होते. ते मार्केटमध्ये चारा घेत असताना त्यांच्यावर पाठीमागून कृष्णा याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. भाऊ मेला असे समजून कृष्णा तिथून पसार झाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बारकूला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता सीसीटीव्हीत हल्लेखोर दिसत होता. मात्र त्याने डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घातला होता. त्यामुळे सीसीटीव्हीत दिसणारा हल्लेखोर नेमका कोण, असा प्रश्न उपस्थित झाला. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके यांनी तपासाची चक्रे फिरवली. अखेरीस अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी हल्लेखोराला पकडले.