चिमुकल्या विद्यार्थ्यांना कानाखाली मारले, हाता-पायावर पट्टीचे वळ, उरणच्या बोरखार शाळेतील संतापजनक घटना

परिपाठासाठी गैरहजर राहिल्याच्या क्षुल्लक कारणावरून शिक्षकाने 12 ते 13 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना उरण तालुक्यात घडली आहे. मारकुट्या शिक्षकाने मुला मुलींच्या कानाखाली तसेच पट्टीने हातावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. याप्रकरणी संतप्त झालेले पालक व ग्रामस्थांनी अशोक कुथे या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उरण तालुक्यातील बोरखार येथे रायगड जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. पहिली ते सातवी वर्गापर्यंत असलेल्या शाळेत 49 मुले, मुली शिक्षण घेत आहेत. सोमवारी शाळा सुरू झाल्यावर परिपाठ घेण्याचा शाळेचा प्रघात आहे. परिपाठाला पहिली ते सातवीतील 12 ते 13 विद्यार्थ्यांना थोडा उशीर झाला. यामुळे संतप्त झालेल्या अशोक कुथे या शिक्षकाने हाताने कानाखाली आणि पट्टीने हातावर वळ उठेपर्यंत बेदम मारहाण केली.

मुलांना झालेल्या मारहाणीचा प्रकार पालकांना समजल्यानंतर संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक व शिक्षकांना धारेवर धरत मारहाणीचा जाब विचारला. इतक्यावरच न थांबता मुलांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून उरण पोलीस ठाणे गाठले. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी तातडीने उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांना चर्चेसाठी बोलावले. तासभर झालेल्या चर्चेनंतर संतप्त झालेले पालक व ग्रामस्थांनी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

शिक्षकाचे निलंबन होणार

पालकांच्या मागणीनंतर अशोक कुथे या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली. शिक्षकांकडून मुलांना झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.