लुपिन, मॅक्लोड्स, नेप्रोड, ब्लीस फार्मा, रामदेव इलका या नामांकित फॅक्टऱ्यांमध्ये चांगल्या पदावर काम केल्यानंतर त्याने घरीच एमडी पावडर हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरू केला. दांडगा अनुभव आणि सखोल ज्ञान यांची सांगड बसल्याने जे ड्रग्ज तयार करण्यासाठी चार दिवस लागतात ते तो फक्त चार तासात तयार करत होता. महिन्याला सुमारे एक कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज बनविणाऱ्या या एमएस्सी केमिस्ट आरोपीवर पोलिसांनी झडप घालून त्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त केला आहे.
पालघर पोलिसांनी अटक केलेल्या या उच्चशिक्षित आरोपीचे नाव अमान मुराद असे आहे. बोईसर काटकरपाडा येथे कलर सिटी इमारतीमधील एका घरात तो एमडी ड्रग्ज तयार करीत होता. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारून तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे एमडी हस्तगत केले.
अमान याने मोठमोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर काम केले आहे. या अनुभवाचा गैरफायदा घेत मुंबईहून औषध कंपन्यांच्या नावे तो कच्चा माल बोईसरमध्ये आणून तेथे प्रक्रिया करून प्रयोगशाळेत एमडी पावडर तयार करत होता असे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपअधीक्षक संगीता शिंदे-अल्फान्सो, उपविभागीय अधिकारी विकास नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार, प्रदीप पाटील, सतीश अस्वर, अनिल व्हटकर, गणपत सुळे, राजेश वाघ, सुनील नलावडे आदी उपस्थित होते.
घरीच थाटली होती प्रयोगशाळा
एमडी पावडर तयार करण्यासाठी अमान याने आपल्या घरीच प्रयोगशाळा थाटली होती. सुरुवातीला एमडी तयार केल्यानंतर त्याने कलीम खान, अमन आरिफ आणि सनी सिंग यांना टेस्ट करण्यासाठी दिले होते. त्यानंतर हे तिघे ड्रग्ज विक्रीचे काम करीत होते. सहा महिन्यांपासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. पोलिसांनी या तिघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या टोळीत अन्य काही आरोपींचा समावेश आहे का, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.