अंदाजपत्रक यंदाही लांबणीवर! सलग चौथ्या वर्षी बजेटला उशीर; मार्च महिना उजाडणार

महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी 15 जानेवारीपूर्वी पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीत सादर केले जाते. मात्र, यंदा निवडणुकांच्या कामांमुळे अंदाजपत्रक लांबणीवर पडल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र, प्रशासक कालावधीत गेल्या तीन वर्षांत मार्च महिन्यात अंदाजपत्रक सादर केले गेले आहे. गेल्या वर्षीही दोनवेळा मुदतवाढ घेतल्यानंतर अंदाजपत्रकास मान्यता दिली होती. आता यंदादेखील महापालिकेचे अंदाजपत्रक सलग चौथ्या वर्षी मार्च महिन्यात सादर होणार असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून प्रशासक म्हणून आयुक्त काम पाहत आहेत. पहिली तीन वर्षे तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी अंदाजपत्रक सादर केले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार महापालिका आयुक्तांनी 15 जानेवारीपर्यंत स्थायी समितीला हे अंदाजपत्रक सादर करणे बंधनकारक आहे. परंतु यावर्षी हे अंदाजपत्रक 15 जानेवारीनंतर सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला गेला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आता कधी अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणार, याकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या विविध भांडवली कामे, वॉर्डस्तरीय कामे, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आदीबरोबरच वेतनखर्च आदी तसेच उत्पन्न आदींचा ताळमेळ घालणारे हे अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाची दिशा दाखविणारे असते. लोकप्रतिनिधी असताना, प्रथम महापालिका प्रशासन (आयुक्त) हे अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समितीला सादर करतात. स्थायी समितीमध्ये या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन आणखी तरतुदी केल्या जातात. यामध्ये वॉर्डस्तरीय कामांचा समावेश असतो. तसेच सत्ताधारी पक्षाच्या धोरणाचे प्रतिबिंबही या अंदाजपत्रकात पडत असते.

  • गेल्या महिन्यात आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांकडून अंदाजपत्रकासंदर्भातील प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार सर्व विभागांनी प्रस्ताव सादर केले आहेत.
  • पालिकाहद्दीत नव्याने समाविष्ट गावांतील नागरी सुविधांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे.
  • या गावांतील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी कामे आवश्यक. भरीव तरतूद 2025-26 च्या अंदाजपत्रकात असेल का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
  • नदीकाठ सुधार योजना, जायका प्रकल्प, मेट्रोचे विस्तारीकरण आदी प्रकल्पांचे काय होणार, हे अंदाजपत्रकावरून समोर येईल.
  • वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला असून, यासाठी अंदाजपत्रकात काय उपाययोजना असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.