महाराष्ट्र पोलिसांवर तोतया पोलीस ठरले भारी ! रविवारी पुन्हा दोघांना घातला दीड लाखाचा गंडा

सराईत गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांवर सध्या तोतया पोलीस भारी पडले आहेत. काही दिवसांपासून या तोतयांनी आपण पोलीस असल्याचे सांगून अनेकांना लुबाडले असून, रविवारी पुन्हा या तोतयांनी ‘तपासणी सुरू आहे’, असे सांगत महिलेसह ज्येष्ठ नागरिकाला 1 लाख 60 हजारांना गंडा घातला. जुना मोंढा रोड आणि ज्योतीनगर भागात या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलीस असल्याचे भासवून समोरील व्यक्तीला हेरून हे तोतया भरदिवसा सर्वसामान्यांची लूट करीत आहेत. शहरात यापूर्वी काही घटना समोर आल्या आहेत, मात्र पोलिसांच्या सापळ्यात अद्यापपर्यंत हे तोतया अडकले नाहीत. त्यामुळे रविवारी पुन्हा तोतयांनी दोन जणांना गंडा घातला. रविवारी सकाळी 10 वाजता जुना मोंढा रोडवरील सम्राट अशोक चौकातून गुलमंडी येथील रहिवासी मीना सुधीर महिंद्रकर ह्या गुलमंडीकडे येत होत्या. या दरम्यान, दोघांनी त्यांना आवाज दिला. त्यामुळे त्या थांबल्या. त्यांना या दोन तोतयांनी ‘पुढे पोलिसांकडून तपासणी सुरू आहे, तुमच्या गळ्यातील सोन्याचे गंठण काढून ठेवा’, असे सांगितले. यावेळी आणखी एक व्यक्ती तेथे आली. त्या व्यक्तीला देखील तोतया पोलिसांनी सोन्याची चेन काढून ठेवायला सांगितली.

या व्यक्तीने चेन काढून ठेवल्यामुळे या महिलेने देखील तिचे गंठण काढून पिशवीत ठेवले. यावेळी त्या तोतयांनी ‘दागिने पिशवीत ठेवू नका, आम्ही गंठण पुडीत बांधून देतो’, असे सांगितले. त्यातील एका भामट्याने ओळखपत्र दाखवीत आपण पोलीस असल्याचीही बतावणी केली. त्यामुळे त्या महिलेला त्यांच्यावर विश्वास वाटला.

तोतयांनी गंठण पुडीत बांधून दिलेली पुडी हातात घेऊन महिला गुलमंडीकडे निघाली. काही वेळ चालल्यानंतर त्या महिलेने पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये खडे असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने
क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली.

रविवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान श्रीकृष्णनगर येथील रहिवासी सतीश संकुडे लाँड्रीमध्ये कपडे टाकण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे जात होते. यावेळी ते ज्योतीनगर येथून रस्त्याने जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना थांबविले आणि ‘पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे’ असे सांगितले. ‘अंगावर सोने घालून फिरू नका, ते एका कागदात काढून ठेवा’ असे सांगत त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन, तीन अंगठ्या काढून एका पुडीत बांधून दिल्या.

संकुडे यांनी थोड्या वेळाने पुडी उघडून पाहिली असता आतमध्ये दागिने आढळून आले नाहीत. याप्रकरणी गुरुगोविंदसिंगपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएसआय मुळीक तपास करीत आहेत.