![dipti 1](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/dipti-1-696x447.jpg)
>> विठ्ठल देवकाते
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या शेतकऱयांच्या मुलांनी सुवर्ण यशाला गवसणी देत स्पर्धेचा 14 वा दिवस गाजविला. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये शेतकरी कुटुंबीयातील दिप्ती काळमेघसह सौरभ पाटीलने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अमरावतीच्या दिप्तीने पदार्पणातच सुवर्णसह रौप्य पदकाची, तर कोल्हापूरच्या सौरभने सलग दुसऱयांदा सुवर्ण भरारी घेतली. 12 वी परीक्षेला दांडी मारत दिप्तीने सुवर्ण भरारी घेतली आहे.
दिप्तीने सकाळच्या सत्रात बायथले प्रकारात रूपेरी यश संपादन केले. दुपारच्या सत्रात दिप्तीने सौरभ पाटीलसह सोनेरी यशाला गवसणी घातली. दिप्ती पुण्यात शॉर्क जलतरण क्लबमध्ये शेखर खासनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दिप्तीची मंगळवारी (दि. 11) बोर्ड परीक्षा सुरू होत आहे. पेपरला दांडी मारून तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. तो आज सार्थकी ठरला. 16 फेब्रुवारीला शेवटचा क्रीडा प्रकार खेळून ती अमरावतीला परीक्षा देणार आहे.
मॉडर्न पेंटॅथलॉनमधील बायथले मिश्र रिलेत सौरभ व दिप्ती जोडीने ही शर्यत 15.16.83 मिनिटांत पूर्ण करीत सुवर्ण यश खेचून आणले. 1600 मीटर धावणे, 200 मीटर जलतरण आणि 1600 मीटर धावणे प्रकाराच्या वैयक्तिक बायथले शर्यत दिप्तीने 16.39.10 मिनिटांत पूर्ण करून दुसरे स्थान संपादन केले. पुरुषांच्या जलतरण स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारात पूर्ण कॉश्यूम फाटल्याने सौरभला पदकापासून वंचित रहावे लागले. गत गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सौरभने 1 सुवर्ण 1 रौप्य पदक जिंकले होते.
माऊंटन बायकिंगमध्ये प्रणीताला सुवर्ण
माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू प्रणिता सोमण हिने सुवर्ण पदकाची भरारी घेतली. प्रथमच समाविष्ट झालेल्या या खेळातही महाराष्ट्राने पदकांची कमाई केली आहे. क्रॉस पंट्री टाईम ट्रायल प्रकारात प्रणिताने चमकदार कामगिरी केली. 46 मिनिटे 26.823 सेपंदांत चुरशीच्या शर्यतीत बाजी मारत सुवर्ण पदक पटकावले. अहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये प्रशिक्षक नितीन ठक्कर यांच्या मार्गदर्शनाद्वारे प्रणिताचा सराव सुरू असतो.
ज्युदोत महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडेचे सुवर्ण यश
ज्युदोमध्ये महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडे हिने सुवर्ण पदक, तर आकांक्षा शिंदे हिने रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या 52 किलो गटात श्रद्धाने अंतिम लढतीत मेहरुख मकवाना या गुजरातच्या खेळाडूवर एकतर्फी विजय मिळविला. 48 किलो गटाच्या अंतिम लढतीत आकांक्षाने उत्तर प्रदेशच्या अस्मिता डे हिला कडवी लढत दिली. आकांक्षाने गुण मिळविण्यासाठी जिवाचे रान केले. मात्र बचावात्मक पवित्रा घेतलेल्या अस्मिताने आकांक्षाला गुण मिळणार नाही याची दक्षता घेत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. आकांक्षाला अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 60 किलो गटातील कांस्य पदकाच्या लढतीत महाराष्ट्राच्या श्रावण शेडगेला उत्तर प्रदेशच्या मोनी शर्माकडून पराभव पत्करावा लागला.
टेबल टेनिसमधील महिला गटात रौप्य
महाराष्ट्राला टेबल टेनिसमधील महिलांच्या सांघिक अंतिम सामन्यात पश्चिम बंगाल संघाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिला सुतीर्था मुखर्जी हिच्याकडून 8-11, 11-6, 12-14, 11-2, 5-11 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दिया चितळे हिने अहिका मुखर्जीवर 12-10, 11-6, 11-6 असा विजय मिळवित 1-1 बरोबरी साधली. तनिषा कोटेचाला पोयमाती बैस्याकडून हार पत्करावी लागली. एकेरीच्या चौथ्या लढतीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिला अहिका मुखर्जी हिने 11-8, 11-6, 13-11 असे पराभूत करीत बंगालच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने हरयाणाचा 3-0 असा पराभव केला.
श्रुती जोशीला कांस्य पदक
महाराष्ट्राच्या श्रुती जोशीने कांस्य पदक पटकावून तलवारबाजीत पदकाचे खाते उघडले. श्रुतीचे वडील धर्मेंद्र जोशी हे नागपूरमध्ये खासगी वाहनावर ड्रायव्हर असून तिचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. श्रुतीने हरयाणाच्या मंजूवर 15-2 गुणांनी दणदणीत विजय मिळविला. जम्मू-कश्मीरच्या श्रेयावर 15-10 गुणांनी मात करून तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली. सुपर 8 लढतींत छत्तीसगडच्या वेदिका खुशीवर तिने 15-10 गुणांनी मात करून पदक निश्चित केले. उपांत्य फेरीत तामीळनाडूची भवानी देवी विरुद्ध श्रुती ही लढत लक्षवेधी ठरली.