![Mantralaya Bhangar6](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Mantralaya-Bhangar6-696x522.jpg)
राज्याचा प्रशासकीय गाडा हाकणाऱ्या मंत्रालयाला सध्या भंगारालयाचे स्वरूप आले आहे. मुख्य इमारत आणि विस्तारित इमारतीत जागोजागी कचऱ्याचे आणि भंगार सामानाचे ढीग पडले आहेत. मंत्रालयाच्या प्रवेशापासून मंत्र्यांच्या दालनाला कॉर्पोरेट स्वरूप देण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. पण कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे मंत्रालयाची सध्या रया गेली आहे.
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मंत्र्यांना दालनाचे वाटप झाले. आता दालनाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. काही मंत्र्यांनी वास्तू सल्लागारानुसार दालनात बदल करण्यास सुरुवात केली. अनेक मंत्र्यांनी त्यांच्या ऑफिसला कॉर्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मंत्री कार्यालयासाठी जागा अपुऱ्या पडू लागल्यामुळे प्रत्येक मजल्यावर अभ्यागतांना बसण्यासाठी असलेल्या जागांचा ताबा घेत नव्याने दालनांचे बांधकाम सुरू केले आहे. या सर्वांमुळे मंत्रालयात कचरा आणि भंगार सामानाचे प्रमाण वाढले आहे. जुन्या दालनांमधील जुने लाकडी फर्निचर, फायलींचे ढिगारे, प्लाय, गोण्यांमध्ये भरलेले प्लास्टर ऑफ पॅरिसचे तुकडे व्हरांडय़ात, जुन्या गोणींमध्ये भरून ठेवलेले आहेत. मंत्रालयात विविध कंपन्यांचे तसेच परदेशी दूतावासातील उच्चाधिकारी येतात. मध्यंतरी जपानी शिष्टमंडळ मंत्रालयात येऊन गेले. दर्शनी भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे शासनाबद्दलचे मत खराब होते.
लाकडाचे सामान नको
मंत्रालयाला ऑगस्ट 2012 मध्ये लागलेल्या आगीनंतर अग्निशमन दलाने सादर केलेल्या अहवालात लाकडाच्या सामानाचा कमीत कमी वापर करा असे नमूद केले होते. तर मुख्य सचिव सुजाता सौनिक सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुख असताना मंत्रालयातील भंगार सामान हटवा, व्हरांडे मोकळे करा, स्वच्छता ठेवा असे आदेश जारी केले होते. पण आता सर्व आदेश धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी भंगाराचे ढीग साचले आहेत.
मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री ज्या व्हीव्हीआयपी गेटमधून प्रवेश करतात त्यांच्या समोरीलच मोकळय़ा जागेचे डंपिंग ग्राऊंड केले आहे. मंत्रालयात जुन्या दालनातील तोडलेले सर्व भंगार सामान, जुनी लाकडे, गोणी, जुने बॉक्स व्हीव्हीआयपी गेटसमोरच फेपून दिलेले आहेत. या जागेच्या बाजूलाच इलेक्ट्रिक मोटारींची चार्ंजग पॉइंट आहे. या भंगार सामानाला दुर्दैवाने आग लागली तर चार्ंजग पॉइंटला धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.