विदर्भातील पारंपरिक विणकाम कला धोक्यात, सिंगल-कॉटन पट्टी किनार साडय़ांचा वारसा जतन करण्यासाठी ‘एनआयएफटी’चा पुढाकार

सिंगल – कॉटन धाग्यापासून विणलेल्या धापेवाडा गावातील पट्टी किनार साडय़ा या महाराष्ट्राच्या कुशल कारागिरीचा पुरावा आहे. मात्र सध्या मशीननिर्मित कापडांच्या रेटय़ामुळे साधे पण उठावदार, नजाकतदार असे हे देखणे वस्त्र लयास जाण्याची भीती आहे. विदर्भाचा हा समृद्ध असा पारंपरिक हस्तकला वारसा जतन करण्यासाठी मुंबईतील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) या शैक्षणिक संस्थेने प्रयत्न सुरू केले आहेत.

प्राध्यापक संदीप किडीले यांच्या मार्गदर्शनाखाली एनआयएफटी संस्थेचे विद्यार्थी विदर्भातील पट्टी किनार साडय़ांच्या समृद्ध विणकाम परंपरेचा मागोवा घेत आहेत. प्रा. किडीले आणि विद्यार्थ्यांची टीम प्रत्यक्ष धापेवाडा गावात जाऊन राहिली. तिथे पट्टी किनार साडय़ांची समृद्ध विणकाम परंपरा जाणून घेतली. तसेच कारागिरांशी संवाद साधला. ही परंपरा टिकवण्यासाठी असलेली आव्हाने समजून घेतली. पट्टी किनार साडय़ांच्या उत्पादन विकासासाठी एनआयएफटी टीम सध्या नागपुरातील राज्य सरकारी संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य हातमाग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केंद्र सरकारच्या विणकर सेवा केंद्र यांच्याशी सहयोग करण्याचा प्रयत्न करत आहे.

पिढय़ान्पिढय़ा जपलेला सौंदर्य साज

सिंगल – कॉटन धाग्यापासून विणलेल्या पट्टी किनार साडय़ा महाराष्ट्राच्या पुशल कारागिरीचा पुरावा आहेत. या साडय़ा अतिरिक्त विणण्याच्या तंत्राचा (एक्स्ट्रा वेफ्ट टेक्निक) वापर करून तयार केल्या जातात. आकर्षक डिझाईन अन् मनमोहक नक्षीदार बुटीजसाठी त्या ओळखल्या जातात. प्रत्येक पट्टी किनार साडीची लांबी 6.5 मीटर असते आणि त्यात 3- इंच साधा बॉर्डर असतो, जो एक साधा पण सुंदर सौंदर्य साज देतो.

सरकारी प्रयत्नांची गरज

पट्टी किनार साडीचे पुनरुज्जीवनासाठी सरकारच्या माध्यमातून धोरणात्मक प्रयत्नांची आवश्यकता आहे. ज्यामुळे हातमाग क्षेत्राला बळकटी दिल्याने विणकर आर्थिकदृष्टय़ा सक्षम होतील. तसेच स्थानिक रोजगार आणि पर्यटनालाही चालना मिळेल.

एनआयएफटी संस्थेमुळे  धापेवाडाचा विणकामाचा वारसा चमकत राहील, याची आम्हाला खात्री आहे. ही कला जतन करणे केवळ कापड जपण्यापर्यंतच मर्यादित नाही, तर इतिहास, संस्कृती आणि हा वारसा जिवंत ठेवणाऱ्या कारागिरांचा सन्मान यातून होणार आहे. प्रा. संदीप किडीले एनआयएफटी, मुंबई